नेकनूर दि.30 : मांजरसुंबा घाटात मंगळवारी सकाळी बुलेटवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मात्र हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यातील मुख्य आरोपी मयताचा मेहुण्यासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपघाताचा केलेला बनाव फसला असून 24 तासात नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
निलेश शहादेवद ढास (वय 25 रा. लिंबागणेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेलेला हा युवक मंगळवारी सकाळी घाटात मयत अवस्थेत आढळला. बुलेटचा अपघात झाल्याचे भासविण्यात आले. मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार खुनाचा असल्याचे नेकनूर पोलिस स्टेशनचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी ओळखले. त्यांनी तातडीने तपासाला गती देत यातील मुख्य आरोपी तथा मयत युवकाचा दाजी मनोज अंकुश घोडके (वय 30) याला पोलिसांनी अंत्यविधी होताच ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी सकाळी यातील उर्वरित आरोपी राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय 21 रा.वांगी) , कृष्णा गोपीनाथ डाके (वय 27 रा.काठोडा) यांना अटक केली. एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल शरद कदम ,खाडे, राख ,प्रशांत शिरसागर, डीडोळ ,सानप, नवले यांनी 24 तासात याची उकल केली. यापूर्वीही एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी तीन खुनाचे गुन्हे काही तासात उघडकीस आणत आरोपी जेरबंद केले आहेत.