marhan, hanamari,

एकादशीला माळकरी आईला मटन करून दे म्हणत खून करणार्‍या मुलाचा मृत्यू

क्राईम पश्चिम महाराष्ट्र


राहुरी, दि. 3 : राहुरीच्या कारागृहात खुनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचे मूत्रपिंडाच्या आजाराने काल शुक्रवारी (दि.2) रात्री दहा वाजता निधन झाले. त्याला रात्री पोटात दुखायला लागल्याने तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. राजेंद्र गोविंद लांडे (वय 46, रा. तांभेरे, ता. राहुरी) असे मृत कैद्याचे नांव आहे.

आरोपी राजेद्र लांडे याने दोन वर्षांपूर्वी एकादशीच्या दिवशी माळकरी आईला मटण बनवण्यासाठी हट्ट धरला होता. परंतु, आईने माळकरी असल्याने एकादशीच्या दिवशी मटण करण्यास नकार दिला. त्या रागातून आरोपीने आईच्या डोक्यात जबर मारहाण केली. त्यातच आईचा खून झाला होता. या प्रकरणी दुसरा मुलगा दिगंबर लांडे याने भावाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयीन कोठडीतील कैदी लांडे याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना तहसीलदार फसियोद्दीन शेख, प्रांताधिकारी दयानंद जगताप, पोलिस उपधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ, नायब तहसीलदार गणेश तळेकर, राहुरीच्या न्यायाधीश सुजाता शिंदे, पोलिस उपनिरिक्षक मधुकर शिंदे, निलेशकुमार वाघ, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, अमित राठोड, सचिन ताजणे उपस्थित होते.

या बाबत पोलिस निरीक्षक दुधाळ म्हणाले, कैदी लांडे दोन महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर राहुरी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय व ससून रुग्णालय, पुणे येथे उपचार करण्यात आले. परंतु, काल (शुक्रवारी) रात्री दहा वाजता त्याचे निधन झाले. त्याच्यावर पुणे येथे उत्तरीय तपासणी केली जाईल. त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल.

Tagged