CBSE BOARD

कोरोना अपडेट

सीबीएसई बोर्डाच्या आता वर्षातून दोन परीक्षा

By Karyarambh Team

July 05, 2021

नवी दिल्ली दि. 5 : कोरोनाव्हायरस साथीच्या अनुषंगाने गेली दोन वर्षं शिक्षण क्षेत्रात गोंधळाचं वातावरण आहे. शाळा, कॉलेज बंद, परीक्षा लांबणीला आणि अखेर रद्द यामुळे पुढचे प्रवेश अडकलेले अशा गोंधळाच्या परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण बोर्डाने म्हणजे सीबीएसईनेे एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दोन परीक्षा द्याव्या लागतील. सेमिस्टर पद्धतीप्रमाणे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या वेळेला परीक्षा घेण्यात येईल. या दोन्ही परीक्षांचे गूण अंतिम गुणपत्रिकेत धरले जातील. दोन्ही सत्र परीक्षा प्रत्येकी 90 मिनिटांच्या असतील. दोन्ही परीक्षांचे पेपर सीबीएसई सेट करणार आहे. पहिली सत्र परीक्षा येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल तर दुसरी सत्र परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे.सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्नही बदलला आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी पर्याय निवडा प्रकारची प्रश्नपत्रिका असेल पण दुसर्‍या सत्रात काही प्रश्न कारणं द्या, सिद्ध करा प्रकारचे बहुपर्यायी असू शकतील. पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्येही बाह्यकेंद्रावर परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसली तर दुसर्‍या सत्रात शाळा दोन तासाची परीक्षा घेतील, असं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे.

अंतर्गत मूल्यांकन ठरणार महत्त्वाचंफक्त पहिलं सत्र आणि दुसर्‍या सत्राच्या बोर्डाच्या परीक्षाच नव्हे तर वर्षभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचं अंतर्गत मूल्यांकन अंतिम गुणपत्रिकेत महत्त्वाचं ठरणार आहे. या अंतर्गत मूल्यांकनालाच जास्त वेटेज देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यासाठी शाळा प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रोफाइल तयार करतील. विद्यार्थ्यांने वर्षभरात पूर्ण केलेला अभ्यास, प्रोजेक्ट, असाइनमेंट यावर विद्यार्थ्याचं अंतर्गत मूल्यमापन होईल आणि त्याची प्रतिमा अंतिम गुणपत्रिकेवर उमटेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून चालणार नाही, तर वर्षभर अभ्यास करावा लागणार आहे.