परळी दि.7 : पत्नी किर्तन ऐकायला गेली म्हणून संतप्त झालेल्या पतीने भरकिर्तनात दगडफेक व तलवारबाजी करून गोंधळ घातल्याचा प्रकार तालुक्यातील मालेवाडी येथे घडला आहे. या प्रकारात मारहाण झालेल्या पत्नीसह सोडवासोडवी करणार्या चार जणांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी या पीडितेच्या पती विरोधात फिर्याद दाखल केली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.6) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरापासून जवळच असलेल्या मालेवाडी येथे मारोती मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम होता. व्याकरणाचार्य हभप अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन सुरु होते. तेव्हा आरोपी माणिक कुंडलिक बदने रा.मालेवाडी हा हातात तलवारीसारखे शस्त्र घेऊन आला. त्याची फिर्यादी पत्नी किर्तनात बसलेली होती. तिच्याजवळ जाऊन तु कोणाला विचारुन किर्तनाला आलीस असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी इतरांनी भांडण सोडवासोडवी करायचा प्रयत्न केला असता संतप्त होत त्याने दगड फेकुन मारले तसेच हातातील शस्त्र फिरवू लागला. या झटापटीत साक्षीदार सुदामा पंडीतराव आंधळे, सरपंच भुराज वैजनाथ बदने, आदिनाथ संभाजी बदने, भरत रामकिसन आंधळे यांनाही दुखापत झाली. याप्रकरणी पत्नीनेच फिर्याद दिल्यावरुन आरोपी पती विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 136/2021 कलम 324, 336, 337, 323, 504,भादंवि व4/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि जिरगे हे करीत आहेत.