pankaja munde

मराठवाडा

कामगारांचा पीएफ थकविल्याप्रकरणी पंकजाताई यांच्या वैद्यनाथवर कारवाई

By Balaji Margude

July 16, 2021

औरंगाबाद, दि. 16 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील पांगरी (जि. बीड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाने कारवाई केली. कामगारांच्या हक्काचे पीएफ थकविल्या प्रकरणी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करत 92 लाखांची वसूली केली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कारखान्याने मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी थकीत रक्कम 1 कोटी 46 लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्व भविष्य निधी थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा भरणा त्वरीत करावा, असे आवाहन क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.आशिया खंडात नावाजलेला हा साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. पगार न मिळाल्यामुळं कारखान्यातील 700 कामगारांनी मागील मार्च महिन्यात बंद पुकारला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचार्‍यांनी थकीत पगारासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते.

कोणतेही बँक खाते जप्त झाले नाही, हा केवळ राजकीयखोडसाळपणा; कार्यकारी संचालकांचे स्पष्टीकरणपरळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.पी.एस. दीक्षितूलू यांनी म्हटले आहे. दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.