pegasus

न्यूज ऑफ द डे

शासकीय कर्मचार्‍यांना मोबाईल वापरासंबंधी राज्य शासनाकडून नियमावली

By Balaji Margude

July 24, 2021

मुंबई ः देशातील पेगॅसस pegasus स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्‍यां कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्याच्या सुचना जारी केल्या आहेत. सरकारतर्फे लँडलाईन फोन वापरासाठी अधिक सोयीस्कर असल्याचे सांगण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) जारी केलेल्या आदेशात राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यासच मोबाइल फोनचा वापर करावा असे सांगण्यात आलं आहे.कार्यालयीन वेळात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले आहे. जर मोबाइल फोन वापरायचे असतील तर टेक्स्ट मेसेजचा अधिक वापर करावा आणि या उपकरणांद्वारे केलेली संभाषणे कमी केली जावीत. कार्यालयीन वेळेत मोबाईलद्वारे सोशल मीडियाचा वापर मर्यादित असावा, असे सरकारने म्हटले आहे.या आचारसंहितेत असे म्हटले आहे की मोबाईल फोनवरील वैयक्तिक कॉलचे उत्तर ऑफिसबाहेर दिले पाहिजे. आसपास लोकं आहेत हे लक्षात ठेवून मोबाइल फोनवर विनम्रपणे आणि कमी आवाजात बोलणे आवश्यक असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. तर, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या फोन कॉलना जराही उशीर न करता उत्तर द्यायला हवे असे यात म्हटले आहे.कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (लँडलाईन) वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करा. मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी. मोबाईलवर बोलताना हळू आवाजात बोलावे. बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना मेसेजचा वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा. मोबाईल व्यस्त असताना लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे. मोबाईलवर कार्यालयीन कामकाजासाठी सोशल मीडियाचा वापर करताना वेळेचे आणि भाषेचे तारतम्य बाळगावे. अत्यावश्यक वैयक्तिक फोन हे कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कक्षात किंवा बैठकी दरम्यान असताना आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा.