क्राईम

पं.स. उपसभापतीची लाईनमनला मारहाण!

By Keshav Kadam

July 25, 2021

माजलगाव ग्रामीण पोलीसात सहा जणांवर शासकीय कामात अडथळा,अ‍ॅट्रॉसिटी दाखलमाजलगाव दि.25 : लाईट लवकर सुरु का करत नाहीस असे म्हणत लाईनमनला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रुग्णालयाच्या बाथरुमध्ये कोंडून मारहाण केली. या प्रकरणी पंचायत समितीच्या उपसभापतीसह सहा जणांवर शासकिय कामात अडथळा व अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वेय माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (दि.24) दुपारी शिंदेवाडी तहत वसंतनागर तांडा येथे वीज बिल वसुलीचे काम करीत होते. यावेळी त्यांना पंचायत समितीचे उपसभापती डॉ. वसीम मनसबदार यांचा फोन आला. ढोरगाव येथील लाईट बंद आहे कधी चालू करणार, असे विचारले. त्यावर इकडचे वसुलीचे काम संपल्यानंतर लाईट चालू करतो असे सांगितले. परंतु मनसबदार यांनी लाईट आत्ताच सुरू कर व तू कुठे आहेस तिथेच थांब असे म्हणून धमकावले. त्यानंतर डॉ. मनसबदार यांच्यासह अन्य पाच जण इनोव्हा गाडीमध्ये शिंदेवाडी फाट्यावर आले. त्यांनी आल्या आल्याच तोंडावर चपटा मारत, मुका मार देऊन बळजबरीने गाडीत घालून पात्रुड येथील डॉ.मनसबदार यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले. तिथे बाथरूममध्ये कोंडून काठीने व निळ्या रंगाचा पी.व्ही.सी. पाईपने मारहाण केली. या प्रकरणी विश्वास रोडे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीसात कलम 353, 332, 365 अ‍ॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुरेश पाटील हे करीत आहेत.