केज

शेततळ्यात बुडून सख्या भावंडांचा मृत्यू

By Keshav Kadam

July 27, 2021

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील घटनाआडस दि.27 : आई-वडील सोबत शेतात गेलेल्या सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी 1 च्या सुमारास केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे घडली. हर्षल माधव लाड (वय 8), ओम माधव लाड (वय 4) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. ते दोघेही आई-वडीलां सोबत स्वतःच्या शेतात गेले होते. तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खुरपणी, फवारणी यासह शेतातील विविध कामे सुरू आहेत. पंधरा दिवसांपासून दररोज पाऊस असल्याने सर्वांचीच पिकातील अंतर मशागतीची कामे बंद होती. एकाच वेळी कामे सुरू झाल्यानं मजुर मिळत नसल्याने घरातील सर्वजण शेतातील कामांसाठी गेली होती. माधव लाड हे सर्वांसह हर्षल व ओम या मुलांना सोबत घेऊन रोकड पट्टी शिवारातील शेतात गेले होते. शेतात सर्वजण आपापल्या कामाला लागले. ही दोन मुले खेळत होती. खेळता-खेळता ते स्वतःच्या शेतातील शेततळ्यावर चढले. येथे खेळताना तळ्यात पडले. गटांगळ्या खात असताना ओरडले त्यामुळे वडील माधव लाड यांचे लक्ष गेले. लेकरं दिसत नसल्याने त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. दोन्ही मुले पाण्यात पडल्याचे दिसून आले. तलावात उडी घेऊन दोघांनाही बाहेर काढून लागलीच अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचं घोषित केले. हर्षल व ओम या दोन्ही भावांवर एकाच चितेवर सायंकाळी 5:30 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.