क्राईम

बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक!

By Keshav Kadam

August 06, 2021

प्रकाश सोळंकेंसह तिघांवर गुन्हा दाखलमाजलगाव दि.6 : दुसर्‍याच्या नावावरील गट नं.171 मधील 00 हे.50 आर जमीन बनावट कागदपत्राद्वारे स्वत:च्या नावावर केली. दुय्यम निबंधक कार्यालय माजलगाव व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून प्रकाश भगवान सोळंके यांच्यासह तिघांविरूद्ध कलम 420 प्रमाणे ठगेगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव येथील प्रभारी दुय्यम निबंधक प्रविण माणिकचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 28 जुलै 2021 रोजी माजलगाव शहर ठाण्याचे पत्र कार्यालयात प्राप्त झाले. सदर पत्रात गंगाराम उर्फ गंगाधर नंदुराम चुंबळे (रा.सादोळा) यांनी शहर ठाण्यात गट नं.11 मधील जमीन बेकायदेशीररित्या व बनावट दस्तावेज आधारे खरेदीकरून माझी फसवणुक केल्याची तक्रार दिली होती. चौकशी अंती याप्रकरणात प्रकाश भगवान सोळंके यांनी इतरांच्या मदतीने अर्जदार गंगाराम चुंबळे यांची गट नं.171 मधील 00 हे .50 आर जमीन बनावट दस्तावेजाद्वारे फसवणुक करून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रकाश भगवान सोळंके (रा.सादोळा), दत्ताभाऊ कदम (रा.फूलेनगर,माजलगाव), नरहरी रामराव घाटुळ (रा.मंगरूळ नं.3 ता.माजलगाव), अशोक गंगाधर पांगरकर (रा.शिवाजी नगर माजलगाव) यांनी आपसात संगनमत करून गंगाराम उर्फ गंगाधर चुंबळे यांचे बनावट आधारकार्ड तयार करून ते खरे असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयात वापरून गट नं.171 मधील जमीनीचे खरेदीखत करून शासनाची फसवणुक केली. म्हणून या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.