sandip kshirsagar, bharatbhushan kshirsagar, jaidatta kshirsagar

न्यूज ऑफ द डे

क्षीरसागरांची भाऊबंदकी आणि नरेगाचं अडकलेलं हूक

By Balaji Margude

August 19, 2021

बालाजी मारगुडे । बीडबीड जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा कशाची असेल तर ती आहे नरेगा घोटाळ्याची. या घोटाळ्यात खंडपीठाने चक्क बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश राज्यसरकारला दिले होते. त्यामुळे देशाच्या इतिहासात या घटनेची नोंद केली गेली आहे. मुळात नरेगाचं हे प्रकरण काय आहे आणि कुठून सुरु झालं याची अनेकांना कल्पना नाही. कार्यारंभ’ने याची सखोल माहिती घेतली असता असे लक्षात आले की हे प्रकरण भाऊबंदकीच्या वादातून पुढे आलेले असून ते क्षीरसागरांच्या राजुरीतून सुरु झाले. त्यामुळे अख्ख्या जिल्ह्याला त्याचं हूक लागलं आहे. प्रकरण खंडपीठात असल्याने अनेकांची घाबरगुंडी उडालेली पहायला मिळत आहे. 2011 ते 2019 या काळात हजारो कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र त्यात घोटाळा किती रुपयांचा झाला याचा अंदाज नाही. परंतु सुत्रांच्या माहितीनुसार 1000 कोटीच्या आसपास बीड जिल्ह्यात हा घोटाळा निघू शकतो.

मुद्देसूद…

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राजकुमार देशमुख यांनी नरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची याचिका दाखल केली होती. त्यावेळी कागदपत्रांची पाहणी करताना न्यायालयाने राजुरीच्या आजुबाजुच्या गावात झालेल्या कामाची माहिती मागवली. त्यात त्यांच्या असे निदर्शनास आले की यात गैरव्यवहार झाला आहे. मात्र याची व्याप्ती केवळ राजुरीपुरती मर्यादीत नसून बीड पंचायत समिती अंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी होण्याची गरज आहे. न्यायालयाने बीड पंचायत समिती अंतर्गत 2011 ते 2019 पर्यंत झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचा अहवाल खंडपीठात दाखल झाल्यानंतर त्या अहवालाआधारे गुन्हा नोंद करण्यात यावा, यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यावर मोठा राजकीय दबाव आणला. हा गुन्हा दाखल झाला असता तर त्यावेळच्या राजुरीच्या तत्कालिन सरपंच रेखाताई रविंद्र क्षीरसागर, तत्कालीन पंचायत समिती सभापती तथा बीडचे आ. संदीप रविंद्र क्षीरसागर आणि इतर अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल झाले असते. मात्र आ.संदीप क्षीरसागर यांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावत असे गुन्हे दाखल होऊ दिले नाहीत. त्यावेळी केवळ अधिकारी, कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल झाले. आ.क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अनुकूल होते. त्यामुळे पोद्दार यांच्याच बदलीसाठीच प्रयत्न झाले. त्यात आ.क्षीरसागर यांना यश देखील मिळाले.

इकडे बीड पंचायत समितीतील नरेगाच्या कामाचा अहवाल बघून खंडपीठाने संपूर्ण बीड जिल्ह्यातील नरेगाच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी जनहित याचिका स्वतःहून दाखल केली. त्यानंतर चौकशीचे आदेश बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले. त्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी ह्या या प्रकरणाची कागदपत्रे गोळा करण्यासाठी एक समिती गठित केली. या समितीने कागदपत्रं गोळा करून ती खंडपीठाकडे सादर केली. 4 ऑगस्ट 2021 रोजीच्या सुनावनी वेळी खंडपीठाने चौकशी अहवाल कुठंय अशी विचारणा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना केली. या दरम्यानच त्यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा चार्ज देखील होता. त्यावेळी त्यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘आम्ही चौकशी केली नसून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी समिती नेमली होती’ असे उत्तर दिले. त्यांचं हे उत्तर ऐकून खंडपीठाने संताप व्यक्त करीत ‘आम्ही चौकशी करण्याचे सांगितले असतानाही तुम्ही केवळ कागदपत्रं जमा केली. त्यामुळे हा न्यायलयाचा अवमान आहे, जिल्हाधिकार्‍यांकडून पारदर्शी चौकशी होण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही’ असा ठपका ठेवत जिल्हाधिकार्‍यांची तातडीने बदली करण्याचे आदेश राज्य सरकारला काढले. त्यामुळे इतिहासात कधी नव्हे असे आदेश आल्याने बीड जिल्ह्याची पुरती नाचक्की झाली होती.आज (दि.18 ऑगस्ट) पुन्हा न्यायालयासमोर याची सुनावनी झाली. त्यात जिल्हाधिकार्‍याकडून पुनर्विचार याचिका दाखल करून घेण्यास देखील न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.

नेमकं काय आहे नरेगाचं राजकारण?क्षीरसागर कुटुंबात संपत्तीच्या वाटणीवरून 2016 पासून धुसफूस सुरु झाली. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीत या घराच्या एकोप्याला तडे गेल्याचे जगजाहीर झाले. बीडमध्ये काय विकास झालाय हा मुद्दा गौण ठरून क्षीरसागर कुटुंबात कुणी कुणावर कशाप्रकारे अन्याय केला हाच कौटुंबिक वादाचा विषय निवडणूक प्रचारात कळीचा मुद्दा होता. या निवडणूक निकालानंतर संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणावर निवडून आले. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडीत संदीप क्षीरसागर यांचे वडील रविंद्र क्षीरसागर यांना त्यांचे बंधू डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मात दिली. काका नगराध्यक्ष झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी नगरसेवकांच्या बळावर आपले बंधू हेमंत क्षीरसागर यांना उपनगराध्यक्षपदी बसवून सर्वच समित्यांचे अध्यक्षपद आपल्या गटाकडे घेतले. त्यामुळे नगराध्यक्ष असुनही काकांना कसलीच हालचाल करता येत नव्हती. पुढे जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. यातही संदीप क्षीरसागर यांनी आपल्या गटाचे तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आणत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना धोबीपछाड देत पंचायत समितीत देखील वर्चस्व निर्माण केले. मात्र ऐनवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी खेळलेल्या खेळीमुळे संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे पंचायत समिती सभापतीपद हुकले होते. पुढे पक्षाकडून देखील संदीप क्षीरसागर यांना ताकद मिळू लागली. विधानसभेचं राष्ट्रवादीचं तिकिट देखील संदीप यांनाच मिळाले त्या निवडणुकीत त्यांनी काकांची 1800 मतांनी विकेट घेतली. तर 2020 मध्ये पंचायत समितीचे सभापतीपद देखील आपल्या गटाकडे घेतले.आता संदीप क्षीरसागर आमदार झाल्यानंतर त्यांनी नगर परिषदेच्या गैरव्यवहारात डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या होत्या. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं खंडपीठात व नगरविकास विभागाकडे दाखल होती. कुठल्याच विकास कामाचं उद्घाटन नगराध्यक्ष भारतभुषण यांना करता येत नव्हतं. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांचा बंदोबस्त करण्यासाठी बीड पंचायत समितीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी हात घातला.संदीप क्षीरसागर 2012 पर्यंतच्या पंचवार्षिकमध्ये पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतरही ही पंचायत समिती त्यांच्याच कार्यकर्त्यांकडे होती. तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मातोश्री रेखाताई क्षीरसागर राजुरीच्या सरपंच होत्या. या काळातच नरेगाची कोट्यावधी रुपयांची बोगस कामे झाली होती. विशेष म्हणजे त्यावेळी जयदत्त क्षीरसागर हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे येथे झालेल्या भ्रष्टाचाराची त्यांना खडा न् खडा माहिती होती.

देशमुखांच्या खांद्यावर ठेवली बंदूक…जेव्हा संदीप क्षीरसागर यांचे नाक दाबायची वेळ आली त्यावेळी माजी मंत्री क्षीरसागर यांनी राजकुमार देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाना धरला आहे. याचिकाकर्ते राजकुमार देशमुख हे मुळ राजुरीचे रहीवाशी असल्याचं सांगितलं जात आहे. कुठल्यातरी वादानंतर 20-25 वर्षापुर्वी ते राजुरी सोडून माजलगाव तालुक्यातील एका गावात स्थायिक झालेले होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.