accident

अंबाजोगाई

वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

By Keshav Kadam

September 02, 2021

रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा तर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यूबीड दि.2 : रुग्णवाहिकेच्या व अज्ञात वाहनाच्या धडकेत वेगवेगळ्या अपघातात बुधवारी (दि.1) रात्रीच्या सुमारास दोघा तरुणांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, गुरुवारी सकाळी केज तालुक्यातील होळ येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, निकेतन दिलीप हजारे (वय 30) असे वाघाळा येथील अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. निकेतन मोबाईल टॉवरच्या कामावर लेबरचे काम करत असे. बुधवारी रात्री उशीर 12.45 वाजताच्या सुमारास तो एकाला भेटण्यासाठी वाघाळा येथून सेलू अंबा टोलनाक्याकडे पायी निघाला होता. यावेळी त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात निकेतनचा जागीच मृत्यू झाला. मयत निकेतनच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. दुसरा अपघात गुरुवारी (दि.2) सकाळी होळजवळ झाला. कारी (ता.धारूर) येथील संतोष रामभाऊ मुजमुले (वय 27) हा तरुण होळ येथे मावशीकडे आला होता. सकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला बसला असताना त्याला रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात जबर जखमी झालेल्या संतोषचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.