क्राईम

एसपींच्या विशेष पथकाने 60 लाखांचा गुटखा पकडला

By Keshav Kadam

September 15, 2021

घोडका राजुरी फाट्यावरील गोदामात छापा बीड : दि.15, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.15) सकाळी घोडका राजुरी फाटा (ता.बीड) येथील गोदामावर छापा मारला. यावेळी गोदामामध्ये 60 लाखांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात वाहन चालक, मालक, गोदाम मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथे एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून बुधवारी सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकार्‍यांनी तेथे छापा टाकला. एका ट्रक व एका टेम्पोतून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले. यावेळी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. गुटख्याचा अंदाजे 60 लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. गुटखा, दोन वाहने, दोन आरोपी असा सर्व मुद्देमाल घेऊन पथक पिंपळनेर ठाण्यात पोहोचले आहेत. या प्रकरणी वाहन चालक रामनाथ जगन्नाथ खांडे, सोमनाथ मुरलीधर वारे, गोदाम मालक दशरथआबा मुळे (रा.घोडका राजुरी, ता.बीड) यांच्यासह वाहन मालकांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात पथक प्रमुख विलास हजारे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि.विलास हजारे, स्वप्निल खाकरे, संभाजी भिल्लारे, बालाजी बास्टेवार व चालक पवार यांनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.