व्यवस्थेचं अपयश; देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला

माजलगाव शेती

जागेअभावी माजलगावात कापूस खरेदी बंद, शासकीय खरेदी केंद्रांमध्येच खासगी खरेदी-होके
माजलगाव ः देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला अशी अवस्था सध्या राज्य व केंद्र सरकारची झाली आहे. कारण शेतकर्‍याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन दरवर्षी नवनव्या योजनांची घोषणा करते. मात्र दुसरीकडे शेतकर्‍यांनी घाम गाळून पिकवलेला माल खरेदी करायला सुद्धा सरकार कमी पडत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी होणार्‍या सरकारी घोषणा या केवळ फार्स ठरत असल्याचं सिद्ध झालं आहे. कारण माजलगावमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्र चालकांनी कापूस ठेवायला जागा नसल्याने कापूस खरेदी बंद केली आहे. तर दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्रावर कमी भावाने शेतकर्‍यांच्या कापसाची खासगीमध्ये खरेदी झाली असून नंतर हाच कापूस हमी भावाने सरकारी खरेदीमध्ये दाखवल्याचा गंभिर आरोप शेतकरी नेते राजेंद्र होके यांनी केला आहे.
माजलगाव तालुक्यातील आठ शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांच्या कापसाची हमी भावाने खरेदी सुरु आहे. एकतर उशिराने सुरु झालेले खरेदी केंद्र त्यातही कोरोनाच्या संकटामुळे दोन महिने बंद असलेली कापूस खरेदी यामुळे जून उजाडूनही हजारो शेतकर्‍यांच्या घरात कापूस पडून आहे. कधी ग्रेडर नाही, तर कधी पावसाचे कारण देत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु कमी अन् बंदच जास्त ठेवली गेली. चार चार दिवस टोकन मिळत नाही. टोकन मिळाले तर गाडी जिनिंगच्या आवारात येवू दिली जात नाही, जिनिंगमध्येही विविध कारणे सांगून गाड्या परत पाठवल्या जातात. अशा कारणांमुळे आठ दिवसांपुर्वी माजलगावमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी रास्तारोको केला होता. यानंतरही प्रशासन शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घ्यायला तयार नाही. कारण आता शासकीय खरेदी केंद्र चालकांनी कापूस ठेवायला जागा नाही, पावसामुळे जिनिंगमधील कापसावर प्रक्रिया होत नाही. आठ दिवस वाळवूनच कापसावर प्रक्रिया करावी लागते, त्यामुळे सध्या जिनिंगमध्ये कापसांचे ढिग लागले असून पावसाने कापसाचे नुकसान होत आहे. त्यामुळे आठ दिवस कापूस खरेदी बंद करावी अशी मागणी शासकीय कापूस खरेदी केंद्र चालकांनी केली आहे. याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी जिल्हा उपनिबंधकांकडे मागे उचित मार्गदर्शन मागवले आहे.
दोन हजार शेतकर्‍यांचा कापूस घरात
कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लॉकडाऊनच्या पुर्वीच 4 हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी केवळ 1862 शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. तर 153 शेतकर्‍यांचा कापूस नाकारलेला आहे. तर उर्वरित 1992 शेतकर्‍यांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे. तसेच 1 जुन ते 3 जुनच्या दरम्यानही मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी शेतकर्‍यांनी नोंदणी केलेली आहे. या सर्व शेतकर्‍यांचा कापूस अद्याप घरात असून त्याचं काय होणार असा प्रश्न आहे.
तालुक्यातील कापूस खरेदीत सावळा गोंधळ
माजलगाव तालुक्यात कापूस खरेदीत कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे. यासाठी एक साखळीच कार्यरत असून नियोजनबद्ध हा घोटाळा केला आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र चालकांनाच खासगी कापूस खरेदी करण्याची परवानगी दिली गेली. ग्रेडर लोकांनी चांगला कापूसही फरतडच्या नावाखाली परत केला. शेतकर्‍यांनी नाईलाजाने तो कापूस अंत्यत कमी दरात खासगी केंद्रावर विकला. मात्र हाच कमी भावात खरेदी केलेला कापूस जिनिंग चालकांनी शासनाच्या खरेदीत मिसळला असून हमी भावाने पैसे उकळले आहेत. असा आरोप राजेंद्र होके यांनी केला आहे.

तालुक्यात ऐवढ्या मोठ्या प्रमाणात खासगी केंद्रावर कापूस खरेदी झाली. मात्र आज एकाही जिनिंगमध्ये कापूस शिल्लक नाही, अथवा त्यांनी बनवलेल्या गठाणही शिल्लक नाहीत. जर हा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर घातला नसेल तर मग आम्हाला कापूस किंवा त्यापासून बनवलेली गठाण दाखवा…
राजेंद्र होके, शेतकरी नेते

Tagged