anil deshmukh

कोरोना अपडेट

अनिल देशमुख यांना मध्यरात्री ईडीकडून अटक; कोर्टासमोर हजर करणार

By Shubham Khade

November 02, 2021

१०० कोटी वसुलीचे प्रकरण

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.

अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथून ठीक 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती होती. किमान सात दिवसांची तरी ईडी न्यायालयात देशमुख यांची कोठडी न्यायालयात मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज ईडी आणि न्यायालयत येथे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत.