school

पहिली ते चौथीच्या शाळांचीही घंटा वाजणार, पण….

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा झाला निर्णय

मुंबई : पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. परंतु, यासंदर्भात लवकरच आवश्यक ती कोरोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातील योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी तर शहरी भागात 8 वी ते 12 वीच्या शाळा -महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात 1 ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. त्याची फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसं दिलं जाईल, याची काळजी घेतली जाईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना नमूद केलं.

Tagged