खळबळजनक; अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदिरही आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा

अंबाजोगाई : परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन, अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीचे पत्र अंबाजोगाईच्या देवल कमेटीमध्ये शनिवारी रात्री पोहोंचले आहे. दरम्यान, असे पत्र महाराष्ट्रात बर्‍याच मंदिराना पाठविले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र प्राप्त होताच देवल कमिटीचे सचिव अ‍ॅड. शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संस्थानच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात आरोपी प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव, जि.नांदेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली आणि सुरक्षितता राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. परळीच्या वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरास ही असे धमकीचे पत्र प्राप्त झाल्याने पोलिसांना आता या प्रकरणाची पाळेमुळे शोधावी लागणार आहेत.

नांदेडमधून दोघांना ताब्यात घेतलं; खोडसाळपणा असल्याचा दावा
पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांच्या एका पथकाने नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे. दहशतवाद विरोधी पथकाने दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली. यावेळी दोघांनीही, पुढील दोन दिवसांत आमची कोर्टात महत्वाची तारीख आहे, यातूनच आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे सांगितले. कोणीतरी मुद्दामहून आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही संशयितांनी केला.

Tagged