न्यूज ऑफ द डे

विष प्राशन करणार्‍या शिक्षिकेसह मुख्याध्यापकाचेही केले निलंबन!

By Keshav Kadam

December 06, 2021

echo adrotate_group(3);

सिईओ अजित पवार यांची कारवाईमाजलगाव दि.6 : मुख्याध्यापकाकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून शनिवारी (दि.4) एका शिक्षिकेने शाळेतच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शिक्षिका व मुख्याध्यापक यांचा हा वाद जिल्हाभरात चांगलाच गाजला होता. त्यानंतर काही संघटनांनी रस्त्यावर उतरुन मुख्याध्यापकावर कार्यवाहीची मागणी केली होती. या प्रकाराने जिल्हा परिषदेची बदनामी झाली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोघांवरही निलंबनाची कारवाई केली आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड आणि सहशिक्षीका संगीता राठोड यांच्यात मागील अनेक महिन्यापासून वाद आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर दीड वर्षानंतर शाळा उघडल्याने त्यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आला. शाळेतच मुलांसमोर दोघांतील अंतर्गत वाद होऊ लागल्याने याची कुणकुण गावातील पालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांना लागली. त्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने दोघांचा वाद मिटवण्याबाबत गटशिक्षणाधिकार्‍याना निवेदन देऊन पालकांनी शाळा बंद ठेवली होती. तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोघांची सुनावणी घेतली. त्याअगोदरच संगीता राठोड या शनिवारी सकाळी राजेवाडी येथे शाळेत गेल्यानंतर 12 वाजण्याच्या दरम्यान विष घेतले. यामुळे शाळेतील शिक्षक घाबरून गेले होते. यानंतर कार्यवाहीची मागणी केली जात होती. त्यानंतर मुख्य अधिकारी अजित पवार यांनी सोमवारी (दि.6) दोघांचेही निलंबन केले असून निलंबन काळात जिंकलवाड यांना आष्टी पंचायत समिती तर शिक्षिका संगिता राठोड यांना पाटोदा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.echo adrotate_group(6); echo adrotate_group(1);echo adrotate_group(5);