15 जुलैपासून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा : अमित देशमुख

महाराष्ट्र

15 जुलैपासून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा : अमित देशमुख
पुणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – 2020 परीक्षा कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले, करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन परीक्षेचे नियोजन केले जात असून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून सुरू होतील, असे सांगितले.

देशमुख म्हणाले. वैद्यकीय विभागाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष ठरलेल्या वेळेनुसार सुरू करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. पण त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

15 जुलैपासून  वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा  घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चित केले जाईल अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. 15 जुलैपासून घेण्यात येणार्‍या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.

Tagged