- पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या टीमने केला पर्दाफाश
- बीडमधील आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी संशयाच्या भोवर्यात
केशव कदम बीड दि. 7 : आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात चक्क बीडचं रॅकेट असल्याचं पुढं आलं आहे. पुणे शहराच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याचा भांडाफोड केला आहे. आरोपींमध्ये लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी, बीड येथील एक जिल्हा परिषद शिक्षक, अंबाजोगाईच्या मेंटल हॉस्पिटलचा वैद्यकीय अधिकारी, नेकनूर येथील रुग्णालयाचा कर्मचारी आणि बीडमधीलच भक्ती कंस्ट्रक्शनमध्ये राहणारा परंतु आता भूम येथे ग्रामीण रुग्णालयात सहायक अधीक्षक असलेल्याचा यात समावेश आहे.
पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यातील आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ पदासाठी परीक्षा झाल्या होत्या. त्यावेळी पुणे शहर पोलीस ठाण्यात आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रविंद्र कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. तर तत्पुर्वीच राहूल प्रभाकर कवठेकर (रा.इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड) या स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.
या प्रकरणाचा तपास पुणे आर्थिक गुन्हे आणि सायबर विभागाकडे आला होता. या विभागाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत सुरुवातीला विजय प्रल्हाद मुर्हाडे (वय 29 रा.नांदी ता.अंबड), अनिल दगडू गायकवाड (वय 31 रा.किनगाव वाडी ता.अंबड) यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. या दोघांच्या तपासातून हा पेपर आरोपी बबन बाजीराव मुंढे (वय 48 रा. पळसखेडा झाल्टा ता.देऊळगाव राजा) याने पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याच्या तांत्रिक तपासात हा पेपर सुरेश रमेश जगताप (रा.बोल्हेगाव ता.घनसावंगी) या क्लासचालकाने तीन परिक्षार्थींना हा पेपर वितरीत केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केल्यानंतर आरोपी संदीप शामराव भुतेकर (वय 38 रा.भाग्योदय नगर सातारा परिसर औरंगाबाद), यास औरंगाबादेतून ताब्यात घेतले. त्याच्या तपासात प्रकाश दिगंबर मिसाळ (वय 40 रा. कामधेनू पार्क, वराळे ता.मावळ, व्यवसाय नेव्हल डॉकयार्डमध्ये खलाशी) यास ताब्यात घेत अटक करण्यात आली.
या सगळ्या आरोपींनी मुख्य आरोपी उध्दव प्रल्हाद नागरगोजे (वय 36 रा. तिंतरवणी. ता.शिरूर व्यवसाय जिल्हा परिषद शिक्षक बीड), याने आरोपी मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभाग लातुरचा प्रशांत व्यंकट बडगीरे (वय 50 रा. योगेश्वरी नगरी अंबाजोगाई), मेंटल हॉस्पिटल अंबाजोगाईचा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड (रा.एकात्मता कॉलनी यशवंतराव चौक अंबाजोगाई), नेकनूर स्त्री रुग्णालयाचा शाम महादू मस्के (रा.पंचशील नगर अंबाजोगाई), भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचा सहायक अधीक्षक राजेंद्र पांडुरंग सानप (रा.भक्ती कंस्ट्रक्शन शामनगर बीड) या सर्वांना 7 डिसेंबर रोजी अटक करून त्यांच्या तपासातून पेपर फुटीची खरी माहिती उघडकीस आणली. हा तपास पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अप्पा पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर शाखेच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नवनाथ जाधव, नितीन चांदणे, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, अनिल पुंडलीक, सुनील सोनवणे या पथकाने केली.
15 लाख रुपयात पेपर फोडला
आरोपी प्रशांत व्यंकट बडगीरे याने डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड याच्याकडून 10 लाख तर शाम महादू मस्के यांच्या कडून 5 लाख रुपये घेऊन पेपर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य प्रशासकी अधिकारी बडगीरे याने पेपर कुठून आणि कसा मिळवला याचा तपास पोलीस करीत आहेत. फोडलेल्या पेपरमध्ये 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवण्यात आली होती.
आणखी मोठे मासे गळाला लागणार
आरोग्य विभागाचा हा पेपर नेमका कसा फोडण्यात आला याचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र या रॅकेट मध्ये आरोग्य विभागातील आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. बीडवर मोठ्या प्रमाणावर संशयाची सुई फिरत आहे.