देश विदेश

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, बिघडत आहे कोरोनाची परिस्थिती…

By Karyarambh Team

June 09, 2020

अनेक देश लॉकडाउन शिथील करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे. आपण यासंबंधी इशारा दिला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

करोनामुळे जगभरात आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 70 लाख लोकांना लागण झाली आहे. डिसेंबर महिन्यात चीनमधून करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती.

पूर्व आशियानंतर युरोप हे करोनाचं केंद्रबिंदू ठरलं होतं. पण आता अमेरिकेने सर्वांना मागे टाकल्याचं चित्र आहे. युरोपमध्ये परिस्थती सुधारत असली तरी जागतिक स्तरावर मात्र ती बिघडत चालली आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनावा येथील पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या 10 दिवसांत करोनाची 1 लाख प्रकरणं समोर आली आहेत. रविवारी जवळपास 1 लाख 36 हजार लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. रविवारी जी आकडेवारी आली त्यामधील 75 टक्के रुग्ण हे एकूण 10 देशांमधील होते. यामध्ये अमेरिका आणि दक्षिण आशियाची आकडेवारी सर्वाधिक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

टेड्रोस यांनी यावेळी सांगितलं की, ज्या देशांमध्ये परिस्थिती सुधारत आहे तिथे आत्मसंतुष्ट असणं हा सर्वात मोठा धोका आहे. अद्यापही करोनाची धोका टळलेला नाही. महामारीला जवळपास सहा महिने झाले आहेत. कोणत्याही देशाने लगेच यामधून बाहेर पडणं योग्य नाही.