वैद्यनाथसह अंबासाखर कारखाना लवकर सुरु न झाल्यास भिषण परिस्थिती उद्भवणार
शुभम खाडे । बीड/अंबाजोगाई
दि. 2 : भाजप नेत्यांच्या ताब्यातील परळीचा वैद्यनाथ आणि अंबाजोगाईचा अंबासाखर कारखाना वेळीच सुरु न झाल्यामुळे बीड व केज मतदारसंघातील ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. येत्या 10 दिवसांत दोन्ही कारखाने सुरु करावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकर्यांमधून होत आहे. दरम्यान, कारखाने वेळीच सुरु न झाल्यास ऊस पेटविण्याची वेळ शेतकर्यांवर येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र यंदा वाढल्याने गाळपाचे नियोजन कारखाना व जिल्हा प्रशासनाला करताना आलेले नाही हे आता स्पष्ट होत आहे. बीड तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या तालुक्यातील ऊस उत्पादकांची मदार यंदाही माजलगाव कारखाना, एनएसएल शुगर, सावरगावचा छत्रपती कारखाना, गेवराईचा जयभवानी, परळी वैद्यनाथ, अंबाजोगाईच्या अंबासाखर आणि केजच्या येडेश्वरी कारखान्यावर आहे. या कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गतवर्षी आणला व शेतकर्यांनी स्वतःहून कारखान्यात आणलेलाही ऊस स्वीकारला होता. त्यामुळे यंदाही हेच कारखाने ऊस गाळप करतील, अशी बीड तालुक्यातील ऊस उत्पादकांना अपेक्षा आहे. परंतु या कारखान्यांपैकी अंबासाखर व परळी वैद्यनाथ हे कारखाने अद्याप गाळपासाठी सज्ज नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. व इतर सुरु असलेल्या कारखान्यांना कार्यक्षेत्रातील अर्थात केज मतदारसंघातील ऊस गाळप करण्यास प्राधान्य द्यावे लागत आहे. यंदा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने ऊसाचे क्षेत्र व ऊत्पन्नाचा दर्जा अनपेक्षित वाढल्याने कारखान्यांकडील वाहनांची व ऊसतोड कामगारांची यंत्रणा तुटपुंजी ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन बीडसह केज मतदासंघातील हजारो एकर क्षेत्रातील ऊसाच्या गाळपाचे नियोजन करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
नॅचरलचा कारभार शिस्तीत
तेलगावचा सुंदरराव सोळंके, आनंदगाव (ता.केज) येथील येडेश्वरी कारखाना, रांजणी (ता.कळंब) येथील नॅचरल शुगर कारखान्याचे गाळप व नियोजन अत्यंत शिस्तीत सुरु असते. आता गेवराईच्या जयभवानी कारखान्यात देखील कडक शिस्त बघायला मिळते, सावरगावचा छत्रपती कारखानाही बर्यापैकी शिस्तीत चालतोय. येडेश्वरी कारखाना प्रशासनात काही प्रमाणात राजकीय कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप दिसून येतो.
चार दिवसांत वैद्यनाथ सुरु होणार?
वैद्यनाथ कारखाना 5 तारखेपर्यंत सुरु होईल अशी माहिती कारखान्यातील सुत्रांनी दिली. चेअरमन पंकजा मुुंडे आणि कारखान्याने कार्यकारी संचालक जे.पी.एस. दिक्षीतुल्लू यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे म्हणणे अधिकृतपणे समजू शकले नाही.
गंगाखेड कारखान्यासह लातूरच्या देशमुखांकडून शेतकर्यांना अपेक्षा
लातूरचे मंत्री अमित देशमुख हे चेअरमन असलेल्या 21 शुगर युनिट क्रमांक 1, माजी आमदार दिलीप देशमुख यांच्या ताब्यातील आणि सर्जेराव मोरे हे चेअरमन असलेल्या रेणा कारखाना, गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे यांनी उभारणी केलेल्या व सध्या परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक असलेल्या गंगाखेड शुगर कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी वाहने, ऊसतोड कामगार यंत्रणा मिळेल, अशी अपेक्षा केज मतदारसंघातील शेतकर्यांना आहे.
एनएसल शुगरला कडक शिस्तीची गरज
माजलगाव येथील एनएसएल शुगरला कडक शिस्तीची गरज आहे. अतिशय नेभळटपणे येथील प्रशासकीय कारभार सुरू असल्याने दलालांचे चांगलेच फावत आहे. माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांची संपूर्ण मदार आता याच कारखान्यावर आहे. यंदा येडेश्वरी कारखाना माजलगावचा ऊस नेईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे एनएसएल शुगर विरोधात एप्रिल महिन्यात शेतकर्यांचा संताप निघू शकतो. येथील अधिकार्यांनी प्रामाणिकपणे काम करून शेतकरी हिताची भुमिका घ्यावी.
कारखान्याचे बॉयलरसह इतर अंतर्गत दुरुस्तीची कामे सुरु आहेत. येत्या 10 तारखेपर्यंत कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न आहे.
-रमेश आडसकर, चेअरमन, अंबासाखर कारखाना, अंबाजोगाई