अंबाजोगाई

ऊस गाळपापासून वंचित राहू शकतो!

By Shubham Khade

January 03, 2022

आ.नमिता मुंदडा : कारखानदारांची बैठक घेऊन नियोजन करा

केज : केज व अंबाजोगाई तालुक्यातील गाळपापासून वंचित राहू शकतो; अशी भीती व्यक्त करत राज्य शासनाने नियोजन करावे, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 पत्रात पुढे म्हटले आहे की, केज, अंबाजोगाई तालुक्यात पाऊस चांगला झाल्यामुळे तलाव, साठवण तलाव, प्रकल्पात, पाणी साठा मुबलक प्रमाणत झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातील परिसरातील साखर कारखान्यांनी सभासांचा ऊस गाळपासाठी नेला तरी मोठ्या प्रमाणवर ऊस शिल्लक राहणार आहे. साखर कारखान्यांनी गाळपासाठी एक्करी उसाचे उत्पादनाचे केलेल्या नियोजनापेक्षा एक्करी उसाचे टनेज (वजन) जास्त होत आहे. अशा परस्थितीत शेतकर्‍यांचा ऊस मोठ्या प्रमाणात गाळपाविना राहू शकतो त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार आहे. त्यासाठी परिसरातील साखर कारखानदारांची बैठक घेऊन नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांचे होणारे संभाव्य नुकसान पाहता ऊसाचे पूर्णपणे गाळप होण्यासाठी व कोणत्याही शेतकर्‍यांचा ऊस गाळपाअभावी राहू नये, यासाठी साखर कारखानदारांची बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत त्वरीत आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार मुंदडा यांनी केली आहे.

आमदार ताई, मुंडेंसह आडसकरांनाही पत्र द्या!राज्य शासनाने ऊस गाळपाचे नियोजन करण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे. परंतु, त्यांच्याच पक्षाचे आणि नेते असलेल्या पुढार्‍यांच्या ताब्यातील कारखाने अद्याप सुरु नाहीत. त्यामुळे आता त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व रमेश आडसकर यांना देखील पत्र लिहून कारखाने वेळीच सुरु करण्याची विनंती करायला हवी, अशी चर्चा होत आहे.