बीड ः जिल्ह्यात सोमवारी (दि.8) पुन्हा सहा पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी 6 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये अंबेवडगाव येथील पुर्वीच्या पॉझिटीव्हच्या कुटुंबातील 10 वर्षे वयाचा मुलगा तर गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रूक येथे ठाणे येथून आलेल्या कुटुंबातील एक मुलगी पॉझिटीव्ह आढळून आली. तर रात्री साडेनऊ वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये बीड शहरातील मसरत नगर भागातील तिघे (हैद्राबाद रिटर्न) आणि आष्टी तालुक्यातील मातावळी येथील 35 वर्षे वयाचा पुरुष पॉझिटीव्ह आढळून आला. मात्र या पुरुषाचा आजच सकाळी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. आता बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हची संख्या 13 झाल्याने जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे.
अंबेवडगाव येथील कुटुंबातील एकजण पाच दिवसांपुर्वी पॉझिटीव्ह आढळून आलेला होता. तर त्याच्या दोन दिवसानंतर लगेच त्याच्या दोन सुनाही पॉझिटीव्ह आढळून आल्या होत्या. आज त्याच कुटुंबातील 10 वर्षीय मुलगाही पॉझिटीव्ह आढळून आला. गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रूक येथे चार जणांचं कुटुंब ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून दाखल झाले होते. याच कुटुंबातील एकजणास प्रवासात अस्वस्थ वाटू लागल्याने शुक्रवारी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तर उर्वरित कुटूंबाने नगर जिल्हयातीलच शेकटा येथील मामाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेकटा ग्रामस्थांनी त्यांना गावात सहारा न दिल्याने मालेगावच्या एका व्यक्तीने त्यांना आपल्या गावी आणले. या व्यक्तीने गावातील व्यक्तींसोबत वाद करीत या कुटुंबाला घरी सहारा दिला. मात्र लगेच नगरला अॅडमीट झालेल्या त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती उमापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली. त्यानंतर गावात कोविड 19 ची अम्ब्यूलन्स आली आणि कुटुंबातील चौघांचे स्वॅब घेतले. त्यातील 18 वर्षीय मुलीचा स्वॅब पॉझिटीव्ह आला तर अन्य सर्वांचा निगेटीव्ह आला आहे.
बीडच्या मसरत नगर भागात आज नव्याने तिघेजण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यांच्यामुळे बीड शहराचं टेन्शन वाढलं आहे. कारण आज आढळून आलेले तिघे अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. शहरातील झमझम कॉलनी येथील गाडी चालक दोन दिवसांपुर्वी पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर तो ज्यांना घेऊन गेला आणि परत आणले त्यांचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतले होते. त्यातील तिघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील मातकुळीचा रुग्ण आज सकाळीच जिल्हा रुग्णालयात मयत झाला. तो मुंबईच्या कंटेनमेंट झोनमधून आला होता. दोनवेळा त्याच्या स्वॅबबाबत निष्कर्ष काढता आलेला नव्हता. आत तिसर्यांदा त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्यात तो पॉझिटीव्ह आढळून आला. रिपोर्ट येण्यापुर्वीच तो मयत झाला.
कंटेनमेंट झोन घोषित
गेवराई तालुक्यातील मालेगाव जिल्हाधिकार्यांनी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. वास्तविक मालेगावात आढळून आलेले पॉझिटीव्ह सदस्य हा खूप वर्षापुर्वीच गाव सोडून ठाणे येथे गेलेला होता. त्यांचं नाव मतदारयादीत नाही, रेशनवर नाही. मात्र गावातील एकजण त्यांना घेऊन आला आणि आता अख्खं गाव कंटेनमेंट झोन घोषित झाले आहे. त्यामुळे पाव्हण्याचा नसता त्रास गावाला झाल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांमधून उमटत आहे.