राशनचे धान्य काळ्या बाजारात जात असल्याचा संशयावरून टेम्पो पकडला

बीड

आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई

अंबाजोगाई : राशनचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याच्या संशयावरून टेम्पो सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने आज सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केज -अंबाजोगाई मार्गावरील लोखंडीसावरगाव चौकाजवळ पकडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील राशन दुकानातील 20 कट्टे गहू खाजगी बारदान्यात भरून टेम्पोतून (क्र.एम.एच.10 सी.आर.4730) काळ्या बाजारात जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पकडले. टेम्पोसह चालक आणि राशन दुकानदारास ताब्यात घेऊन युसूफवडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पो.हे.कॉ.बालाजी दराडे, राजू वंजारे, रामहरी भंडाणे आदींनी केली. दरम्यान, धान्य राशनचे आहे की नाही? या चौकशीसाठी युसूफवडगाव पोलिसांनी अंबाजोगाई तालुका पुरवठा अधिकार्‍यांना पत्र दिले आहे. पुरवठा विभागाच्या तपासणी अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल, असे सहायक पोलीस निरीक्षक डॉ.संदीप दहिफळे यांनी सांगितले.

पुरवठा विभागाच्या अहवालाकडे लक्ष
काळ्या बाजारात धान्य जात असल्याच्या संशयावरून पोलीस वाहन ताब्यात घेतात. पुढे पुरवठा विभाग चौकशीत क्लिनचिट देत असल्याने टेम्पो सोडून द्यावा लागतो. हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे याप्रकरणात पुरवठा विभाग चौकशी करून काय अहवाल देणार? याकडे लक्ष लागले आहे.

Tagged