अंबाजोगाई

उमराईत ‘रोहयो’त गैरव्यवहार; सीईओंकडे सोमवारी सुनावणी

By Shubham Khade

February 13, 2022

डॉ.गणेश ढवळे यांचा पाठपुरावा

अंबाजोगाई : तालुक्यातील उमराई ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील 6 लाख 7 हजार रूपये गैरव्यवहार झाल्याचे 2020 मध्ये केलेल्या सामाजिक अंकेक्षणातून समोर आले. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास उपमुख्य कार्यकारी आधिकारी प्रदीप काकडे जाणीवपूर्वक कारवाईस दिरंगाई करत असून भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी आयुक्तालयाकडे तक्रार केली. उपायुक्तांच्या आदेशानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे सुनावणी घेण्यात तयार झाले.त्यांनी तक्रारदार डॉ.गणेश ढवळे यांना सोमवारी (दि.14) सुनावणीस उपस्थित राहणेबाबत पत्र दिले आहे.

डॉ.ढवळे यांनी म्हटले की, उमराई ता.अंबाजोगाई ग्रामपंचायत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2020 मध्ये झालेल्या सामाजिक अंकेक्षणात दि.2 सप्टेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 6 लाख 7 हजार रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सामाजिक अंकेक्षणामध्ये समोर आले आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटर, संगणक परिचालक यांनी संगनमतानेच स्वतःच्या आणि गावाबाहेरील मजुरांच्या नावे पैसे उचलण्यात आले आहेत. दरम्यान, आता रोहयो उपायुक्तांच्या आदेशानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पवार हे सुनावणीस तयार झाले. त्यांनी कार्यवाहीबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, कार्यवाहीला गती मिळाल्याने रोहयो घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

भ्रष्टाचार झाल्याबाबत बीडीओंचा अहवालगटविकास अधिकारी संदीप घोनीसकर यांनी दोन वर्षांपूर्वी उमराई ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामात साडेसात लाख रूपयाचा घोटाळा झाला असून वरिष्ठांना अहवाल सादर केल्याचे कळवले आहे. परंतु उपमुख्य कार्यकारी काकडे जाणीवपूर्वक भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली होती.