क्राईम

लग्न जुळेना; स्वतःच सरण रचून घेतली उडी

By Shubham Khade

February 17, 2022

तरूणांच्या लग्नाचा मुद्दा चव्हाट्यावर

बुलढाणा : पेशाने शेतकरी, त्यात शेतीही जेमतेम, त्यात कर्जाचा वाढता डोंगर यामुळे लग्न जुळण्यास अडचणी येत असल्याने खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाने आत्महत्या केली आहे.

महेंद्र नामदेव बेलसरे (30 वर्षे) असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने चक्क स्वतःचंच सरण रचून त्यामध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबात कोणी मुलगी द्यायला देत नसल्यानं शेतकरी तरुणांना होणारा त्रास पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द या छोट्याशा गावात बुधवारी दोन ठिकाणी लग्न समारंभ होते. महेंद्र बेलसरे हा युवकही या लग्नांमध्ये सामील झाला होता. परंतु सायंकाळी अचानक महेंद्र एकटाच आपल्या शेताकडे गेला. शेताकडे गेलेला महेंद्र परत आलाच नाही. त्याने आपल्या शेतामध्येच रात्री आठच्या सुमारास स्वत:च सरण रचत आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी घेतली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी या तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्या निराशेपोटी आत्महत्या केली अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांनी दिली आहे.