अंबाजोगाई

कत्तलखान्यावर छापा; १११ गोवंशीय जनावरांची सुटका

By Shubham Khade

February 18, 2022

एसपींच्या पथकाची अंबाजोगाईत कारवाई

अंबाजोगाई : शहरातील बाराभाई गल्लीतील एका कत्तलखान्यावर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१८) दुपारी ११ वाजता छापा मारला. या कारवाईत टेम्पो, पिकअपसह १९ लाख १५ हजार मुद्देमाल जप्त केला. तब्बल १११ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने केली.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट यांनी अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्लीतील एका कत्तलखान्यात छापा मारला. त्या ठिकाणाहून गाय, बैल अशा १११ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी ही जनावरे वरवटी (ता.अंबाजोगाई) येथील स्व. गोपीनाथ मुंडे गोरक्षण शाळेत पाठवण्यात आली. सपोनि. गणेश धोक्रट यांच्या फिर्यादीवरून कत्तलखाना मालकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गणेश धोक्रट, पोह. संतोष गिराम, सुंदर भिसे, पाटेकर, काळे, शेख, चालक एकनाथ पवार यांनी केली.

महिन्यातील तिसरी कारवाईफेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाने स्वाराती रुग्णालयाजवळ जनावरांचा टेम्पो पकडला होता. त्यानंतर याच पथकाने गुरुवारी सायंकाळी कत्तलखान्यावर कारवाई केली. ही कारवाईची प्रक्रिया पूर्ण होताच पोलीस अधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी मोठी कारवाई केली.