अंबाजोगाई

टेम्पोची उभ्या पिकअपला धडक; एक ठार, १९ जखमी

By Shubham Khade

February 19, 2022

बर्दापूर पाटीजवळ अपघात

अंबाजोगाई : भरधाव वेगातील टेंपोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअपच्या मागे थांबलेल्या चालकाचा दोन्ही वाहनात चिरडून जागीच मृत्यू झाला तर पिकअपमधील १९ जण जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई – लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक आज शनिवारी पहाटे (दि.१९) दिड वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील मयत आणि जखमी लातूर जिल्ह्यातील आजनी बु. (ता. शिरूर अनंतपाळ) येथील आहेत.

आजनी बु. येथील ठाकूर कुटुंबीय अन्य नातेवाईकांसह वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी पिकअप वाहनातून (एमएच २४ एबी ६६२४) अहमदनगरला निघाले होते. वाटेत बर्दापूरच्या पुढे आल्यानंतर नंदगोपाल डेअरीजवळ ते सर्वजण पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून उतरले. थोड्यावेळाने सर्वांना वाहनात बसवून पिकअप चालक ज्ञानेश्वर पांडुरंग ठाकूर (वय ४२) हे मागील बाजूचा फालका लावत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेंपोने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनाच्या मध्ये चिरडून ज्ञानेश्वर ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप मधील उर्मिला उद्धव ठाकूर (४०), खंडू बळीराम खाणशेट्टी (४५), मुकेश उद्धव ठाकूर (१२), दैवाशाला ठाकूर (४०), रुख्मिनबाई नामदेव ठाकूर (६०), रुपाली गोविंद ठाकूर (११), रेणुका गोविंद ठाकूर (३९), कलावती बाजी येरांडे (४८), रावसाहेब शिंदे (४४), गजानन बालाजी शिंदे (२७), गंगाधर रामा कोरे (७०), अजय माधव शिंदे (१२), बालाजी मुक्ताराम ठाकूर (३७), कमलबाई ठाकूर (६०), ओंकार ज्ञानेश्वर ठाकूर (१५), मेघा ज्ञानेश्वर ठाकूर (३८), मनुबाई गणशेट्टी (७०), विष्णू ज्ञानेश्वर ठाकूर (१२) सर्व रा. आजनी बु. आणि अर्चना माधव शिंदे (३५, रा. घनसावरगाव) हे जखमी झाले. सध्या १२ जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून एकास लातूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत केली. दरम्यान, अपघातानंतर टेंपोचालकाने घटनास्थळाहून टेंपोसह पळ काढला.