क्राईम

घराला लागलेली आग विझवताना गॅस टाकीचा स्फोट; तरुणाचा जागीचा मृत्यू

By Shubham Khade

March 29, 2022

धारूर तालुक्यातील घटना

धारूर : तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेतवस्तीवरील दोन घरांना उन्हाच्या तीव्रतेने अचानक आग लागली. ही आग विझवताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२९) दुपारी घडली.

रवी श्रीहरी तिडके (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके, रामकिसन कारभारी तिडके यांचे पत्राचे शेड व गोठा आहे. या गोठ्यास दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके हा येथील टाकीतील पाणी घेऊन आग विझवत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात गॅस टाकीचा पत्रा मानेला लागल्यामुळे गंभीर जखमी होऊन रवी श्रीहरी तिडके याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे.