अंबाजोगाई

नागझरीत घरातच वेश्या व्यवसाय; आंटीला अटक, पीडितेची सुटका

By Shubham Khade

April 05, 2022

बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

अंबाजोगाई : शहराजवळील नागझरी परिसरात एका घरातच वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने उघडकीस आणला. एका आंटीला अटक करण्यात आली असून पीडितेची पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केली.

सीमा मनोहर माने (वय ४५, रा.नागझरी, अंबाजोगाई) असे ताब्यात घेतलेल्या आंटीचे नाव आहे. तिचा नागझरी परिसरात राहत्या घरी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी डमी ग्राहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी आंटीला ताब्यात घेतले. तसेच, एका पीडितेची सुटका देखील केली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सपोनि.सुरेखा धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.प्रताप वाळके, मपोहेकॉ.सुरेखा उगले, पॉको.सतीश बहिरवाल, मपॉको.निलावती खटाने, पॉको.विकास नेवडे यांनी ही कारवाई केली.