क्राईम

बंधार्‍याच्याकडेला मयत अर्भक आढळले!

By Keshav Kadam

April 11, 2022

बीड दि.11 : सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एका दिवसाचे मयत पुरुष जातीचे अर्भक सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास आढळले. सदरील अर्भक हे एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मयत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे.

बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍याच्या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले मयत अर्भक गुराख्याला दिसले. त्याने याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, अंमलदार प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, चालक कृष्णात बडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पांढर्‍या कपड्यामध्ये गुंडाळलेले मयत पुरुष जातीचे अर्भक दिसून आले. त्यावर कुठेही जखम झालेली नव्हती. हे अर्भक एक दिवसाचे असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सदरील अर्भक हे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.