केज तहसील कार्यालयातील घटना
केज : सख्ख्या भावाने कोयत्याने महिला नायब तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील तहसील कार्यालयात आज (दि.६) सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती.
आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदारांचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत बसलेल्या असताना त्यांचा सख्खा भाऊ आला. त्याने गोंधळ घालत अचानक धारदार कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला रूममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, केज पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले असून कोयता जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.