Site icon कार्यारंभ लाईव्ह

रजनी पाटील यांचे निलंबन कायम

वाचा कधी होणार निर्णय?

नवी दिल्ली : राज्यसभेतील काँग्रेसच्या प्रतोद रजनी पाटील यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ काढून तो प्रसारित केला. त्यामुळे सभागृहाचा अवमान झाला, असा पाटील यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या त्यांच्या निलंबनाच्या मुद्दयावर सोमवारी विशेषाधिकार समितीच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

विशेषाधिकार समितीचा अहवाल प्राप्त न झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतरही रजनी पाटील यांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे. संसद भवनात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या अध्यक्षतेखालील १० सदस्यांच्या विशेषाधिकार समितीची बैठक झाली. पण, त्यात काँग्रेसचे अभिषेक सिंघवी, भाजपच्या सरोज पांडे, माकपचे एलामरान करीम, बिजू जनता दलाचे मानस रंजन मंगराम हे चार सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत अन्य विषयांवर निर्णय होऊ शकले नाहीत. आजच्या बैठकीत समितीपुढे एकूण सहा विषय होते. त्यापैकी तृणमूल काँग्रेस राज्यसभा सदस्य डोला सेन यांनी सभागृहात घातलेल्या गोंधळाबद्दल त्यांनी बिनशर्त मागितलेल्या माफीचे पत्र स्वीकारण्यात आले. अन्य पाच विषयांवरील निर्णय होऊ शकले नाहीत. दरम्यान, समितीची पुढील बैठक दि.१६ मे रोजी होणार आहे.

Exit mobile version