Site icon कार्यारंभ लाईव्ह

सरकार माझ्याविरोधात ट्रॅप लावून काहीतरी षडयंत्र रचतंय -मनोज जरांगे

MANOJ JARANGE

MANOJ JARANGE


बीड, दि.16 : आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काही मराठा समन्वयकांना सोबत घेऊन माझ्याविरोधात काहीतरी षडयंत्र रचत आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE यांनी केला आहे. मुंबईकडे कूच करण्याच्या काही दिवस आगोदर जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुंबई आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काहीतरी षडयंत्र रचत असल्याची मला माहिती आहे. मात्र, त्याला अधिकृत मानलेलं नाही. मी खोलात जाऊन हे खरं आहे का? याची माहिती घेत आहे. मात्र, मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे की, सरकार खूप मोठं षडयंत्र रचणार आहे. कारण मी सरकारला मॅनेज होत नाही आणि फुटत देखील नाही. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेले, ज्यांच्या दुकानदार्‍या होत्या त्या सगळ्या बंद पडल्या आहे. अशा लोकांचा असंतोष असून, त्यांना मी आतून खपत नाही. मी आरक्षणाचा मुद्दा संपवायला निघाल्याने या लोकांना खूप वाईट वाटत आहे. या लोकांना मराठा आरक्षणाचा विषय संपू द्यायचा नव्हता असा त्यांच्या डोक्यात विचार होता असे मला वाटत असल्याचे जरांगे म्हणाले. सरकारमधील मंत्र्यांनी काही मराठा समन्वयकांना हाताशी धरलं आहे. अशा लोकांना रॅलीत पाठवायचं, त्यानंतर आम्हाला रॅलीतून हाकलून दिल्याचा आरोप करायचा, आम्हाला बोलवले नाही, आम्हाला किंमत दिली नाही असे आरोप करायचे, आम्हाला राम राम किंवा जय शिवराय घातला नाही, असे कारण देऊन काही लोकं बाहेर पडतील. काही लोकांना आमिष दाखवून असे करण्यास सांगितले असेल. मात्र पैशासाठी किंवा आमिषापोटी मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करणार का? असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, काहींच्या मुंबई, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगरला कानाकोपर्‍यात बैठका होऊ लागल्यात असेही जरांगे म्हणाले.

मला नेता बनायचं नाही आणि मी नेता म्हणून काम करत नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो बलिदान गेले आहे. त्यांचे, कुटुंब देखील आम्हाला नेता बनायचं नाही असं म्हणतात. तुमच्यासारखं प्रसिद्धी मिळावी म्हणून ते हपापले नाही. तुम्ही काय नाटक करतायेत, कोणतं षडयंत्र रचत आहात, तुमच्या मागे कोणता मंत्री उभा राहत आहे, सर्व काही आम्हाला माहीत होत आहे. फक्त त्यांची अधिकृत नाव आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही शांत आहोत. एकदा नाव समोर येऊ द्या, मग सांगतो सगळ्यांना, असेही जरांगे म्हणाले.

Exit mobile version