Site icon कार्यारंभ लाईव्ह

महावितरणला एसीबीचा हायहोल्टेज झटका!

acb office beed

acb office beed


-50 हजाराची लाच घेतांना कार्यकारी उप अभियंत्यासह तिघे जाळ्यात
बीड दि.17 : बीड एसीबीची कारवाई एकावर होतांना दिसतच नाही. प्रत्येकवेळी लाचखोरांची संख्या ही दोन, तीन पेक्षा जास्तच असते. यावरुन लाच स्विकारणार्‍या कार्यालयातील सगळीच यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे दिसून येते. सध्या महावितरणकडून ग्राहकांची जोरात लूट सुरु आहे. नवीन मीटर बसवणे, वीज जोडणी देणे यासाठी सर्रास पैशांची मागणी केली जात आहे. बीड एसीबीने पात्रुड येथे वीज चोरीचा दंड न टाकण्यासाठी पावणे दोन लाखांच्या लाचेची मागणी करुन तडजोडअंती 50 हजार स्विकारण्याचे मान्य केले. ही लाच स्विकारल्याप्रकरणी उपअभियंता, वायरमन, खाजगी इसम अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BEED ACB NEWS)

महावितरणचे कार्यकारी उपअभियंता विवेक जनार्धन मवाडे, वायरमन शेख जलील शेख अब्दुला, खाजगी इसम मोमीन मोहीब अशी लाचखोरांची नावे आहेत. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे तक्रारदाराचे चहापाण्याचे हॉटेल आहे. त्यांचे मीटर जळाल्यामुळे वायरमनच्या परवानगीने दुसरीकडून लाईट घेतली. ही बाब वायरमनने कार्यकारी उपअभियंता यांना सांगून दंडाची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला. त्याप्रमाणे हॉटेलची झडती घेऊन वीजचोरी पकडली व पावणे दोन लाख रुपये दंडाची भीती दाखवली. तडजोडीत 50 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. बीड एसीबीने सापळा रचला. कार्यकारी उपअभियंत्याच्या सांगण्यावरुन वायरमनने ही लाच खाजगी इसमाच्या स्वाधीन केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुुरु आहे. ही कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या उपस्थितीत सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, खरसाडे, राठोड, हनुमान गोरे, गणेश म्हेत्रे, पुरी यांनी केली.

Exit mobile version