बीड : परराज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी 28 दिवस क्वारंटाईनचे नियम पाळावेत. अंत्यविधी, लग्न समारंभाला उपस्थित राहू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. यात वधू-वर, त्यांचे आईवडील, मयताचे सख्खे नातेवाईक यांना सशर्त सवलत असल्याचेही नमूद आहे.
पत्रकात त्यांनी पुढे म्हटल्याप्रमाणे, अंत्यविधीसाठी 10 व विवाह समारंभासाठी 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे, परंतु इतर जिल्हा राज्यांमधून व्यक्ती आल्यास त्यांनी स्वत: शासन नियमानुसार आल्यापासून 28 दिवस कडकपणे येथील परिवारासह होम क्वारंटाईन होणे अपेक्षित असते. परंतु ते असे न करता अंत्यविधी व विवाह समारंभासाठी सामील होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये वाढ होत आहे. त्याअनुषंगाने याद्वारे सर्व नागरिकांना आहवान करण्यात येते की, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यातून व राज्यातून व्यक्ती आल्यास त्यांनी सदरील अंत्यविधी व विवाह समारंभासाठी उपस्थित राहू नये व कडकपणे 28 दिवस होम क्वारंटाईनेचे नियम पाळावेत. जर अशी कोणतीही व्यक्ती या नियमांचे उल्लंघन करत असल्यास किंवा सदरील कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास संबंधित व्यक्ती व ज्यांचे मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशा व्यक्ती विरुष्द तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. सदरील प्रतिबंधात्मक निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. यात वधूकर व त्यांचे आई-वडील यांना विवाहसमारंभापुरती . तसेच निधन झालेल्या व्यक्तीचे सख्खे नातेवाईक यांना अंत्यविधी पुरती सुट देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा भारतीय दंडसहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि इतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.