Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीडमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला लुटले!

mobile chor, mobile chori

mobile chor, mobile chori

हातातील अंगठ्या, रोख रक्कम असा 66 हजारांचा मुद्देमाल लंपास

बीड : बीड जिल्ह्यात चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बस, बसस्थानक येथील चोऱ्यांसह घरफोड्याही वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाईत मोदींच्या सभेच्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त असताना चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळविले, त्यानंतर बीडमध्ये मोदींच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला पकडुन हातातील अंगठ्या, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे चोरट्यांची जिल्ह्यात दहशत वाढल्याचे दिसून येत आहे.

कृष्णा उत्तमराव हिस्वनकर (वय ५६ रा.शहानुरवाडी, छत्रपती संभाजीनगर ह.मु. बिंदुसरा पोलिस अधिकारी कॉलनी, बीड) असे लुटलेल्या पोलिस निरीक्षकांचे नाव आहे. हिस्वनकर हे छत्रपती संभाजीनगर येथे एसआरपीएफ ग्रुप-१४ येथे बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत. सध्या लोकसभा निवडणूक असल्याने ते चार दिवसांपासून बीडमध्ये बंदाेबस्तासाठी आलेले आहेत. रविवार, ५ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता हिस्वनकर हे जिल्हा रूग्णालयाच्या बाजुच्या रस्त्याने बिंदुसरा कॉलनीकडे जात होते. याचवेळी दुचाकीवरून दोघे आले. त्यातील एकाने हिस्वनकर यांना पकडून ठेवले तर दुसऱ्याने त्यांच्या हातातील दोन अंगठ्या, रोख पाच हजार रूपये असा ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन धुम ठोकली. त्यानंतर ७ मे रोजी बीड शहर पोलिस ठाणे गाठत हिस्वनकर यांनी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, बीड शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

पोलीस निरीक्षकास लुटल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच बीड शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा चोरट्यांच्या शोधात कामाला लागली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले जात असून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version