Site icon कार्यारंभ लाईव्ह

मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात! गावात शांतता!!

मातोरी : मातोरी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सोशल मीडियावरून जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.


ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन घेऊन भगवान गडाला जाणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तींतरवणी, माळेगांव येथील ग्रामस्थ दुचाकी रॅली आणि डी जे लावून पाडळशिंगी कडे निघाले होते. त्यांची रॅली मातोरी गावात आल्यानंतर रॅलीतील तरुणांनी त्या गावात डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. डिजेवर एक दोन गाणे डान्स केल्यानंतर मोठी ट्रॅफिक जॅम झाली. त्यामुळे मातोरी ग्रामस्थांनी या तरुणांना इथे डीजे वाजवू नका म्हणून सांगितले. त्याच कारणावरून ग्रामस्थ आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी रॅली मधील काही तरुणांनी शिवीगाळ सुरू करीत एका हॉटेलवर दगड भिरकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेकीला सुरुवात झाली. यात काही जणांना मार लागला आहे. तर चार ते पाच दुचाकीवर दगड मारून त्यांचे नुकसान करण्यात आले आहे. तर डिजेचे देखील नुकसान करण्यात आले आहे. तर महा मार्गावर गाड्या अडवून त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार देखील घडले आहेत. घटनेची माहिती समजल्यानंतर चकलंबा पोलिस आणि बीड जिल्ह्याचे राखीव पोलिस व इतर अधिकारी यांनी तातडीने गावात पोहोचून त्यांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

अफवांचे पेव फुटले
प्रा लक्ष्मण हाके भगवान गडावर येणार म्हणून महा मार्गावर ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. मात्र इकडे मातोरी ग्रामास्थामध्ये असा गैरसमज निर्माण झाला की आता दुसरा समूह हा आपल्या गावावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेकांनी आपापल्या नातेवाईकाना कॉल करून माहिती देण्यास सुरुवात केली. परिणामी दोन्ही समाजाचे लोक मोठ्या संख्येने मातोरी परिसरात जमण्यास सुरुवात झाली. मातोरि येथील कृष्ण नगर येथे दगडफेक देखील करण्यात आली असे आज ग्रामस्थ सांगत आहेत.

हाके यांचा पुढील दौरा रद्द
हाके काल भगवानगडहून चौंडीकडे निघणार होते. पहाटे त्यांनी भगवानगडाचे दर्शन घेतल्यानंतर पुढील दौरा रद्द करत असल्याची घोषणा त्यांचे सहकारी पी. टी. चव्हाण यांनी केली.

शांत रहा, शांतता बिघडवू नका – प्रा. लक्ष्मण हाके
घटनेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले लाठ्याकाठ्या हातात घेण्याचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका. आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणाचं संरक्षण करणाऱ्या दोघांनी कायदा हातात घेऊ नये. शांत राहा, गावाची शांतता बिघडू नका, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच त्यांनी मातोरीच्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला. ते बीडच्या तेलगाव येथे बोलत होते. आम्ही उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गाने आम्ही आमची मागणी मागत आहोत. तरुणांनी कुठलाही कायदा हातात घेवू नका. दगडफेक आणि रस्ता रोको करु नका. गाडी फोडून दहशत माजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतील तर मी त्याचा निषेध व्यक्त करतो. संविधानावर विश्वास ठेवा, भीती बाळगू नका. पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था ठेवावी. लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका. रोज एकमेकांची तोंड पाहायची आहेत. भांडण आणि हिंसा हा उपाय नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

शांतता राखण्याचे पालकमंत्री मुंडे यांचे आवाहन
घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

खा. बजरंग सोनवणे यांचेही शांततेचे आवाहन
माझ्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे घडलेल्या घटनेबाबत मी प्रशासनाशी बोललो आहे. प्रशासनाला ही सूचना केल्या की शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे करता येईल ते करा. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्णपणे काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. बीड जिल्ह्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की, शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

Exit mobile version