Site icon कार्यारंभ लाईव्ह

गतिरोधकामुळे हळूवारपणे चालणार्‍या वाहनांना टेम्पोने उडविले ; दोघे ठार!

-बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकातील भीषण अपघात

बीड दि.8 ः बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात सोमवारी (दि.8) सायंकाळच्या सुमारास स्पीडब्रेकरवर वाहने हळूवारपणे चालत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने पुढे चालत असलेल्या गॅस टाक्याचा रिक्षा, कार, प्रवाशी रिक्षा यासह दोन दुचाकींना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी असून चौघे किरकोळ जखमी आहेत. जखमींवर जिल्हारुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (beed accident news)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीराम अभिमान तांदळे (वय 28 रा.तांदळवाडी, ता.जि.बीड), बबन बाबुराव बहिरवाल (वय 40 रा.भाळवणी ता.केज) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर अशोक रामभाऊ बहिरवाळ हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीड बाह्यवळणावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात गॅस टाक्या वाहतूक करणारा रिक्षा, प्रवाशी वाहतूक करणारा रिक्षा, एक कार, दोन दुचाकी हे बीडकडे येत होते. गतिरोधक असल्याने ही वाहने हळूवारपणे चालत होती. याचवेळी बीडकडे येणार्‍या भरधाव टेम्पो (यूपी-78, एचटी-7553) चालकाचे अचानक पुढे वाहने पाहून नियंत्रण सुटले आणि सर्व वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती पोलीसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोह.आनंद मस्के, अतिष मोराळे, संतोष मुंडे, सुनिल अलगट, रामहरी गर्जे यांच्यासह राख, नन्नवरे, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. टेम्पो चालक फरार झाला असून जखमींच्या व मयतांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती शिवाजी बंटेवाड यांनी दिली. (beed bypass chouk accident)

Exit mobile version