Site icon कार्यारंभ लाईव्ह

पुजाताई मोरेंची बंडखोरी, गेवराईत अर्ज दाखल

pooja more, puja more,

पुजाताई मोरे ह्या तळागाळातील विस्थापित लोकांचे नेतृत्व करतात. म्हणून त्या मतदारसंघात थेट जनतेच्या संपर्कात असतात.

गेवराई, दि.28 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेवराईची जागा सोडवून न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे यांनी आज गेवराई विधानसभा मतदारसंघातून तिसर्‍या आघाडीतील छत्रपती संभाजीराजे यांचा पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांनी आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.

पुजाताई मोरे या यांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून गेवराईच्या राजकारणात 2017 मध्ये एन्ट्री केली होती. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवून विजय मिळवला होत. मात्र काहीच दिवसात बदामराव पंडित आणि त्यांचे बिनसल्याने त्यांनी माजी खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात शेतकरी चळवळीत काम केले. वर्षभरापुर्वी त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पवार यांच्या पक्षाकडे गेवराईत कोणीच कार्यकर्ता नव्हता. त्यामुळे पवारांनी देखील ही गेवराईतून पुजा मोरे यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले होते. मात्र आता ही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्याने पुजाताई मोरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या तिसर्‍या आघाडीकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय आज घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला. त्यानंतर लागलीच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला.

स्वतः कुणबी, पण तरही मराठा आरक्षण चळवळीत काम
पुजाताई मोरे ह्या मूळ कुणबी-मराठा आहेत. मात्र असे असतानाही त्यांनी मराठा चळवळीत मराठा आरक्षणासाठी काम केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या मराठा क्रांती मोर्चाचे पहिल्यांदा बीजारोपन झाले त्या पहिल्या वहिल्या बैठकीत पुजाताई मोरे यांनी तडाखेबंद भाषण करून मराठा क्रांती मूक मोर्चा काढला पाहीजे ही भुमिका मांडली. तेव्हापासून ते आजपर्यंत मराठा आरक्षण चळवळीतील प्रत्येक लढ्यात त्यांचा हिररीने सहभाग राहीला आहे. आताही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक लढ्यात सहभाग नोंदवलेला आहे.

पवार-पंडित विरोधक हीच खरी ओळख

पुजाताई मोरे यांनी शेतकरी प्रश्नावर गेवराईत अनेक आंदोलने केली. त्यात त्यांच्यावर गुन्हे देखील नोंद झाले. गेवराईच्या राजकारणात 1962 पासून ते आजपर्यंत कधीच पवार आणि पंडित कुटुंबाच्या बाहेर सत्ता गेलेली नाही. एकदाच सुंदरराव सोळंके यांना बिनविरोध पवार-पंडितांनी निवडून दिले होते. पवार आणि पंडित यांच्या गुलामीतून गेवराई मतदारसंघ सोडवायचा आहे, असा चंग त्यांनी बांधलेला आहे.

कोरोना काळात गावागावात पोहोचल्या पुजाताई
कोरानाच्या भयंकर महामारीत रस्त्यावर माणूस दिसत नसे. त्या काळात पुजाताई मोरे यांनी गेवराई मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरी जात त्यांना अर्सेनिक अल्बमच्या इम्युनिटी पॉवर वाढविणार्‍या गोळ्या मोफत दिल्या होत्या. कोरोना काळात शेतकर्‍यांच्या फळभाज्या विक्रीअभावी खराब होत होत्या, त्यावेळी पुजाताई मोरे यांनी या शेतकर्‍यांना छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबईची बाजारपेठ विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती.

कारखानदारांशी दोन हात
पुजाताई मोरे या सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. गेवराईच्या प्रस्थापितांच्या गुलामगिरीची चौकट मोडून काढत त्यांनी एकटीने महिला असतानाही आपला लढा उभा केला आहे. गेवराई, माजलगाव, बीड तालुक्यातील ऊस राज्यातील अनेक कारखान्यांना जातो. परंतु हे कारखानदार शेतकर्‍यांना उसाचे बीलच देत नाहीत. पुजाताई मोरे यांनी राज्यातील अनेक कारखान्यांवर धडक मारून ऊस उत्पादकांना त्यांच्या मालाचे पैसे मिळवून देण्याचे काम केले आहे.

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी करताना

जळीत उसाची पाहणी करताना

शेतकर्‍याच्या पोरीला बळ द्या- पुजाताई मोरे
यावेळी बोलताना पुजाताई मोरे म्हणाल्या, माझा लढा हा शेतकरी आणि विस्थापितांसाठी आहे. कुठल्याही जातीविरोधात माझा लढा नव्हता. देश स्वतंत्र झाला, महाराष्ट्र देखील स्वतंत्र झाला. पण आजही गेवराई मतदारसंघ हा पवार आणि पंडित कुटुंबाच्या गुलामगिरीत खितपत पडलेला आहे. इथल्या तरूण मुलांच्या हाताला रोजगाराचे कसलेही साधन नाही. छत्रपती संभाजीनगर सारखे औद्योगिक शहर तासाभराच्या अंतरावर असतानाही इथे एमआयडीसी सारखे प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. गोदावरीचे पाणी सिंदफणा पात्रात आणले तर इथल्या कोरडवाहू शेतीला सोन्याचे दिवस येतील. जिनींग उद्योगासारखा मोठा उद्योग गेवराईत टिकवून ठेवण्याची गरज आहे. वस्त्रोद्योगासारखा मोठा प्रोजेक्ट मतदारसंघात आला तर गेवराईचा विकास छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर करता येणार आहे. परंतु मी, माझी संस्था, माझा कारखाना, माझं घर, माझी वाळू, माझं रेशन यापलिकडे इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी कधी पाहीलेच नाही. गेवराईत राजकारणातून पैसा, पैशातून राजकारण आणि दहशत हे चित्र बदलवून टाकावे लागेल. प्रस्थापिंताविरोधातील हा लढा सोपा नाही, मात्र मीच पंडित आणि पवारांची दहशत मोडून काढलेली दाखवेल. मला संपविण्याचे अनेक उद्योग, कट कारस्थानं झाली. पण सगळ्यांच्या लक्षात आले आहे की ही पोरगी संपणार नाही. आता मतदारांवर जबाबदारी असून माझ्यासारख्या उच्चशिक्षीत शेतकर्‍याच्या मुलीच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने उभे रहावे, असे आवाहन पुजाताई मोरे यांनी केले आहे.

कोराना काळात गावागावात- घरा घरात जावून जनतेला धीर देत त्यांची विचारपूस करताना व त्यांना इम्युनिटी पॉवर वाढविण्यार्‍या गोळ्यांचा पुरवठा करताना…

छत्रपती संभाजीनगर येथे निघालेल्या पहिल्या मराठी क्रांती मोर्चातील क्षण

Exit mobile version