Site icon कार्यारंभ लाईव्ह

वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी!

WALMIK KARAD

WALMIK-KARAD

अभुतपूर्व बंदोबस्तात रात्री साडेदहा वाजता केज न्यायालयात हजर

दोन्ही बाजुच्या समर्थकांची प्रचंड गर्दी

प्रतिनिधी । बीड
दि. 1 : पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागीतल्याच्या आरोपात सीआयडीकडे शरणागती पत्करलेले वाल्मिक कराड यांना रात्री साडेदहा वाजता केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मिक कराड यांना केज न्यायालयात रात्री हजर केले जाणार असल्याची माहिती कळताच दोन्ही बाजुच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीला पांगविण्यासाठी पोलीसांची मोठी दमछाक झाली. अनेकदा पोलीसांनी हलकासा लाठीमार करीत गर्दीला पांगविले. यावेळी या परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.
मंगळवारी (दि.31 डिसेंबर) पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर सीआयडी पोलीसांनी वाल्मिक कराड यांना उशीरा केज न्यायालयात हजर करण्याबाबतचा निर्णय घेतला. केज कोर्टाला तशा प्रकारची विनंती देखील करण्यात आली. कोर्टाने सीआयडीची विनंती मान्य करीत रात्री उशीरापर्यंत या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सीआयडी पोलीस वाल्मिक कराड यांना घेऊन दुपारी साडेचारच्या सुमारास बीडच्या दिशेने निघाले होते. रात्री साडेनऊ वाजता वाल्मिक कराड यांना घेऊन पोलीस केजमध्ये पोहोचले. सुरुवातीला त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांना केज ठाण्यात नेऊन रात्री 10 वाजता अटकेबाबतीची संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली. त्यानंतर रात्री साडे दहा वाजता त्यांना केजच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील एस.एस. देशपांडे यांनी सरकारी पक्षाचे वतीने लढण्यास ऐनवेळी नकार दिला. त्यानंतर जे.बी. शिंदे या दुसर्‍या वकीलांची नियूक्ती करण्यात आली.
बरोबर पावणे अकरा वाजता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यावेळी सरकारी पक्षाकडून वाल्मिक कराड यांच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कराड यांचा संतोष देशमुख खून प्रकरणात सहभाग आहे का हे तपासणे आहे. खंडणी आणि खून प्रकरणातील प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेणे आहे. जप्त मोबाईलची तपासणी करणे, त्यासाठी कराड यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सीआयडीकडून कोर्टात करण्यात आला. तर वाल्मिक कराड यांचे वकील अ‍ॅड. अशोक कवडे यांनी कराड यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. वाल्मिक कराड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गरीब राजकारणी आहेत. त्यांच्यावर केवळ खंडणीचा आरोप आहे. आरोप झाला म्हणून कोठडी दिलीच पाहिजे असे नाही. कराड यांना केवळ राजकीय द्वेशातून अडकविण्यात येत आहे. दोन कोटीची मागणी केली म्हणतात तर मग दोन कोटी दिले का हे देखील सांगावे. कराड हे स्वतःहून सरेंडर झाले आहेत त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने निर्णय घेऊ नये, असाही युक्तीवाद यावेळी करण्यात आला. पावणे अकरा ते सव्वा अकरा वाजेपर्यंत दोन्ही बाजुंच्या वकीलांचा युक्तीवाद सुरू होता. रात्री 12 वाजता न्यायधीशांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय दिला.

Exit mobile version