Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोविड सेंटरमधून 31 वर्षीय रूग्णाचे पलायन

aaropi

aaropi

केज : येथील कोविड सेंटरमधून एका रुग्णाने पलायन केल्याची घटना आज (दि.27) उघडकीस आली आहे. तो व्यक्ती नांदुरघाट येथील असून 31 वर्षीय आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, सदरील व्यक्तीविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या काही दिवसांपून फरार असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार गोविंद एकीलवाले, पोहेकॉ.श्रीमंत उबाळे, तुळशीराम जगताप, पोकॉ.गणेश नवले, पोना.हडके आदींनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले होते. त्यानंतर तपासकामी केज पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यास दि.25 रोजी न्यायालयापुढे हजर केले असता जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याची कोरोना अँटिजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यास कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ (दि.26) रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. परंतू त्याने त्याठिकाणाहून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाने केज पोलिसांना तसे पत्र देऊन कळविले आहे. दरम्यान, नांदुरघाट चौकीचे पोहेकॉ.मुकूंद ढाकणे, शिवाजी सानप यांनी पलायन केलेल्या रुग्णाच्या संपर्कात न येण्याचे आवाहन तो राहत असलेल्या वस्तीवर जाऊन केले आहे. केज पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे, त्याने कसे पलायन केले हे ज्ञात नाही, असे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी सांगितले.

Exit mobile version