Site icon कार्यारंभ लाईव्ह

सिव्हिलला मिळाले 100 ऑक्सिजन जम्बो सिलेंडर; 57 सुपूर्द, उर्वरित 43 मिळणार

बीड जि.प.च्या पदाधिकारी, अधिकार्‍यांचा पुढाकार

बीड : जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवल्याप्रमाणे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सर्व अधिकारी तसेच जिल्हा परिषदेशी संलग्न असलेले अभियंते यांनी लोकसहभागातून जिल्हा रुग्णालयास 100 ऑक्सिजन जम्बो सिलेंडर देण्याचा निर्धार शनिवारी केला आहे. त्यानुसार आज 57 जम्बो सिलेंडर आणून ते जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहेत. तर उर्वरित 43 सिलेंडर देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.

  पालकमंत्री धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे,  जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ही बाब साकारली आहे. शासकीय आयटीआय येथेही आणखी एक कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे, त्यासाठीही या सिलेंडर्सचा उपयोग होणार आहे. एकीकडे रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर दुसरीकडे विविध जनरेशन प्लांट वर व आयात केलेल्या ठिकाणी ऑक्सिजन भरून ठेवण्यासाठी सिलेंडर कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत हे 57 जम्बो सिलेंडर निश्चितच आरोग्य यंत्रणांसाठी फायदेशीर ठरणार आहेत, आणखी 43 जम्बो सिलेंडर लवकरच उपलब्ध करून देऊ; असे जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद प्रांगणात आज हे 57 जम्बो सिलेंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, महिला व बालकल्याण समिती सभापती यशोदाताई जाधव, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती सविताताई मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, शिवाजीराव सिरसाट, बाळासाहेब मस्के, जि.प. सदस्य अशोक लोढा, विठ्ठल थडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, रामेश्वर मुंडे, भागवत औताडे, रणजित क्षीरसागर यांसह आदी उपस्थित होते. बीड जिल्हा परिषदेने सामाजिक बांधिलकी जपत हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version