Site icon कार्यारंभ लाईव्ह

आ.सुरेश धस मराठा आरक्षणावर बीडमध्ये सोमवारी काढणार मोर्चा

suresh dhas

suresh dhas

बीड, दि. 24 : मराठा आरक्षण प्रश्नावर आता भाजपाचे विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस रस्त्यावर उतरणार आहेत. सोमवार (दि.28 जून) रोजी बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघत आहे. हा मोर्चा सुरेश धसांचा नसून तो भाजपाचा आहे असेही आ.धस म्हणाले.

बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत धस बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यात राज्य सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. सरकारने इतक्या उशीरा विनंती याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने योग्य तो पाठपुरावा केला तर समाजाला आरक्षण मिळू शकते. त्यासाठी सोमवारी बीडमध्ये या प्रश्नावर मोर्चा काढणार असल्याचे आ.धस म्हणाले.

मराठा आरक्षणासोबतच धसांनी विविध प्रश्न देखील मांडले. ते म्हणाले युरिया खताचा बफर स्टॉक कशासाठी करताय? प्रत्येक कृषी दुकानदारांना हे खत विक्रीसाठी उपलब्ध करून द्या. कृत्रिम टंचाई दाखवून शेतकर्‍यांना जादादराने खत घेण्यास भाग पाडू नका, अशी मागणीही आ.धस यांनी केली. याशिवाय कोविड काळात ज्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी रुग्णांची सेवा केली त्यांनाच येणार्‍या भरती प्रक्रीयेत प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी मागणीही आ.धस यांनी केली.

त्याचबरोबर रेल्वे, गावतलाव, पाझर तलाव, स्टेट हायवे याकरीता शेतकर्‍यांच्या जमीनीचे केलेल भुसंपादनाचे पैसे ताबडतोब देण्यात यावेत. त्याचे निवाडे अधिकार्‍यांनी रखडून ठेवले आहेत. कोरोना काळ असल्यामुळे आम्ही आतापर्यंत यावर काही बोललो नाहीत परंतु आता अधिकार्‍यांनी तातडीने प्रकरणाचे निवाडे करावेत, अशी मागणीही आ.धस यांनी केली.

Exit mobile version