Site icon कार्यारंभ लाईव्ह

ऑक्सिजनअभावी देशात एकाचाही मृत्यू झाला नाही

bharati pawar

bharati pawar

केंद्र सरकारची संसदेत माहिती

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशात ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असं लिखीत उत्तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लिखीत स्वरूपात संसदेत दिलं आहे. त्यांच्या या उत्तराने देशही आचंबित झालेला असून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनअभावी रुग्ण रस्त्यांवर आणि रुग्णालयात मृत पावले का? असा प्रश्न काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना सांगितलं की, आरोग्य हा राज्यांच्या अख्यत्यारितील विषय आहे. केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये झालेल्या मृतांच्या आकडेवारीची माहिती देण्यासाठी सांगितलं होतं. त्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण मृत पावला असं कोणत्याही राज्याच्या आणि केंद्र शासित प्रदेशाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं नाही. ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही या केंद्र सरकारच्या उत्तरावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. ऑक्सिजन अभावी देशात हजारो मृत्यू झाले असून ज्या लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे त्यांनी केंद्र सरकारवर खटला दाखल करावा असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र होतं. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अनेकांना तर हॉस्पिटलमध्ये बेडही उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यांनी रस्त्यावरच आपला जीव सोडला. असं असताना केंद्र सरकार म्हणतंय की ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही. सरकारच्या उत्तराने देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Exit mobile version