Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोनाबाधितांकडून लुटलेले साडेचौदा लाख रुग्णालयांना करावे लागणार परत

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; लेखापरिक्षणातून बाब उघड

बीड : कोरोना काळात बीड जिल्ह्यात ७९ खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची परवानगी जिल्हा आरोग्य विभागाने दिली होती. या रुग्णालयांमध्ये ७ हजार १७ रुग्णांकडून तब्बल साडेचौदा लाखांची जादा रक्कम लुटल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. ही रक्कम संबंधित रुग्णांना तात्काळ परत करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी बुधवारी रुग्णालयांना दिले आहे.

आदेशात पुढे म्हटले आहे की, कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची परवानगी देतानाच खाजगी रुग्णालयांना शासनाकडून उपचाराचे दर निश्चित करून दिले होते. तरीही काही रुग्णालयांनी जादा रक्कमा आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने लेखापरीक्षणाचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात प्रशासनाने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास मान्यता दिलेल्या एकूण ७९ खाजगी रुग्णालयांतील देयकांची तपासणी करण्यासाठी १२९ अधिकाऱ्यांची एकूण १७ भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. या पथकांनी २० जून २०२१ पर्यंत खाजगी रुग्णालयांत उपचार घेतलेल्या एकूण ७३०६ रुग्णांच्या देयकांपैकी ७०१७ देयकांचे लेखापरिक्षण केलेले आहे. लेखापरिक्षण प्रक्रियेत जिल्ह्यातील रुग्णालयांनी रुग्णांना त्यांच्या देयकांमध्ये एकूण १ कोटी ९५ लाख ७० हजार ४५४ रुपये इतकी सूट दिल्याचे आढळून आले आहे. तथापी, रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा १४ लाख ३९ हजार २८१ रुपये इतकी जादा आकारणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर जादा आकारणीच्या रक्कमा संबंधित रुग्णांना तात्काळ परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत. दरम्यान, या आदेशामुळे खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

ज्या रुग्णांना देयकांच्या आकारणीबाबत आक्षेप आहे, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा. योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
-तुषार ठोंबरे, जिल्हाधिकारी, बीड

Exit mobile version