Site icon कार्यारंभ लाईव्ह

सगळं करणारे आम्हीच, पैसे देऊन टाक.. ट्रॅपमध्ये चौथा आरोपी अडकला!

acb office beed

acb office beed

लाच मागणारा, स्विकारणारा, प्रोत्साहन देणारा
अन् आता सगळं व्यवस्थित करणाराही अटकेत

-सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी  

केशव कदम । बीड
बीड दि. 22 ः भावाभावात झालेल्या वादामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने लाचेची मागणी केली, मात्र मध्येच काम आल्याने हवालदार बाजुला गेले, अन् त्यांची अर्धवट राहिलेली बोली सोबत असलेल्या सोनवणे मुनशी यांनी पूर्ण केली. ‘सगळं काही करणारे आम्हीच असतोत, गुन्हा दाखल न करण्याची जबाबदारी आमची, त्यामुळे पैसे देऊन टाक’ असं वक्तव्य करणारा पोलीस कर्मचारीही एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तलवाडा येथील प्रकरणात आरोपींची संख्या चार झाली असून चौघांनाही दोन दिवसांची (24 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास बीड एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे हे करत आहेत.

बीड पोलीस दलात वाढलेली लाचखोरी वारंवार होणार्‍या कारवायावरुन समोर येत आहे. अगदी किरकोळ कामासाठी लाचेची मागणी केली जात आहे. तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एका तक्रारदाराचे भावाभावात वाद झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदार हरिभाऊ महादेव बांगर (वय 48 रा.पालवन चौक, बीड) यांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान ही बोलणी सुरु असतानाच बांगर यांना दुसरे काम लागल्याने ते बाजुला गेले. मग राहिलेली बोलणी पूर्ण करण्यासाठी त्यांचा मुनशी पोलीस नाईक अमोल युवराज सोनवणे (रा.ताकडगाव रोड, बीड) हा पुढे आला. त्याने तक्रारदारास  ‘सगळं काही करणारे आम्हीच असतोत, गुन्हा दाखल न करण्याची जबाबदारी आमची, त्यामुळे पैसे देऊन टाक’ असे म्हणून लाचेची मागणी केली. दरम्यान ही लाच रविवारी (दि.21) सायंकाळी खाजगी इसम बुद्धभुषण तुळशीराम वक्ते (वय 29 रा.जातेगाव, ता.गेवराई) याने स्विकारली. तर ही लाच देण्यासाठी खाजगी इसम तात्याभाऊ दिंगबर कुचेकर (वय 36 रा.जातेगाव) याने प्रोत्साहन दिले. या प्रकरणी चौघांवर तलवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चौघे अटकेत असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोघांवर निलंबनाची कारवाई होणार
लाचखोरी प्रकरणी हरिभाऊ बांगर, अमोल सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

ट्रॅप होता एकाचा
अन् अडकले चौघे

तक्रारदार घाबरलेला असल्यामुळे त्याने सुरुवातील फक्त हरिभाऊ बांगर यांनीच लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. मात्र सापळा लावल्यानंतर सगळं व्यवस्थित करणारे अमोल सोनवणे, लाच स्विकारणारा बुद्धभुषण वक्ते, लाचेसाठी प्रोत्सहान देणारा तात्याभाऊ कुचेकर असे चौघे एसीबीच्या जाळ्यात अडकत गेले.
—————- 

Exit mobile version