Site icon कार्यारंभ लाईव्ह

भविष्यात मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी करावी लागेल, नितीन गडकरींचं मोठं विधान

Nitin Gadkari

nitin gadkari

मुंबईः कोरोनाचं संकट महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. मुंबई-पुण्यात नोकरीसाठी गेलेल्याची गर्दी याविषयी नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे.

कोरोनाचं संकट भारतात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. महाराष्ट्रात हे घडलं मुंबई आणि पुण्याच्या बाबतीत. परपप्रांतातुन आलेल्या लोकांची गर्दी घराकडे निघाली तेव्हा मुंबई आणि पुण्यातील गर्दीचा अंदाज सगळ्यांना आला.

कोरोनाचे संकट सरल्यानंतर मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते आज झी 24 तास या वृत्तवाहिनीशी इ कॉन्क्लेव्ह मध्ये बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्राला व्यापार्‍याच्या क्षेत्रात कोणत्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी सविस्तर चर्चा केली.

सध्या मुंबईत कोरोनाचं संकट किती गंभीर आहे, हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे मुंबईबाहेर स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात झाली पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

याशिवाय, भविष्यात समुद्र आणि नद्यांमध्ये सोडण्यात येणार्‍या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. तरच पर्यटनासाठी बाहेरून लोक महाराष्ट्रात येतील. सध्याचा काळ हा कठीण आहे. मात्र, महाराष्ट्राकडे एक राज्य म्हणून खूप क्षमता आहे. त्यामुळे कोरोनानंतर महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. हे सांगताना त्यांनी मला भाषिक किंवा प्रांतीय राजकारण करायचे नाही परंतू मुंबई आणि पुण्याच्या बाहेर उद्योग उभारून तेथील लोकसंख्या कमी करायला हवी असे मतही मांडले. यावेळी त्यांनी भविष्यात आपल्यापुढे असलेल्या संधी आणि आपण कोणते उद्योग करू शकतो हे देखील सविस्तर मांडले.

आता दिल्लीत असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात
मी महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे. आता दिल्लीत असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येतेय. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. कदाचित राज्याबाहेर आल्यावरच मराठी संस्कृतीचे मोठेपण समजते, असे उद्गार यावेळी नितीन गडकरी यांनी काढले.

Exit mobile version