Site icon कार्यारंभ लाईव्ह

अर्धांगवायूने पत्नीचा मृत्यू होताच पतीनेही घेतला अखेरचा श्वास

बीड : पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्याच्या धक्क्यातून न सावरलेल्या पतीलाही अर्धांगवायूचा झटका आला आणि तासाभराच्या अंतरानेच त्यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. ही घटना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात रविवारी (दि.2) सकाळी एकाच वार्डात घडली.

  सत्यभामा शिरुरे (वय 48) व सुनील शिरूरे (वय 55 दोघेही रा.पद्मावती गल्ली, परळी) असे मयत दाम्पत्याने नाव आहे. हे दाम्पत्य गेल्या काही वर्षापासून परळीत वास्तव्यास होते. ते मुळचे नळेगाव (ता.चाकूर जि.लातूर) येथील होते. सुनील शिरुरे हे परळी येथील वैद्यनाथ देवस्थानात कर्मचारी म्हणून काम पाहत होते. तर त्यांच्या पत्नी गृहिणी होत्या. परळीत राहत्या घरी सत्यभामा शिरुरे यांना शनिवारी सायंकाळी अर्धांगवायूचा झटका आला. परळीतील एका खाजगी रुग्णालयातून त्यांना उपचारार्थ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी वार्डात दाखल करताच पत्नीच्या आजाराच्या धक्क्यातून न सावरलेल्या सुनील शिरुरे यांना देखील अर्धांगवायूचा झटका आला. त्याच वार्डात दाखल करुन त्यांच्यावर देखील उपचार सुरु करण्यात आले होते. उपचारादरम्यान पत्नीने सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर नाथ्रा (ता.परळी) येथे अंत्यसंस्कार सुरु असतानाच स्वाराती रुग्णालयात त्यांचे पती सुनील शिरुरे यांनी देखील सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. तासाभराच्या अंतराने त्यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने परळीतील पद्मावती गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे. परळीतील छायात्रिकार लखन शिरुर, चित्रकला शिक्षक दत्तात्रय शिरुरे यांचे ते आई-वडील होत.

Exit mobile version