Site icon कार्यारंभ लाईव्ह

पाचोड पोलीस ठाण्याची हद्द म्हणजे अट्टल गुन्हेगारांचे माहेरघर

daroda, gharfodi

daroda, gharfodi

दरोडेखोरांनी शेतकर्‍याला तीन लाखाला लुटले

पैठण  : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याची हद्द म्हणजे अट्टल गुन्हेगारांचे माहेरघर बनले आहे. या हद्दीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. शेतकर्‍यांना मारहाण करून तीन लाख रुपयाचे ऐवज लुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेती वस्तीवर राहणार्‍या शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
      सोलापूर हायवेवर असलेल्या पाचोड येथील शेती वस्तीवर आठ ते दहा दरोडेखोरांनी शुक्रवारी मध्यरात्री या परिसरात धुमाकूळ घातला. शेतवस्तीवरील ज्ञानेश्वर माणिकराव भुमरे गट नं 158 हे रात्री जनावरांना चारा टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे चारा टाकून झोपी गेले. काही वेळातच आठ ते दहा दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळविला. घरात झोपलेल्या ठकुबाई घुमरे, नातू प्रथमेश भूमरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरातील रोख 1 लाख 50 हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज लुटला. या मारहाणीत जखमी झालेले शेतकरी ज्ञानेश्वर भुमरे यांच्या घराची बाहेरून कडी लावून दरोडेखोर पळून गेले. प्रथमेश भुमरे यांनी घराच्या पत्रे काढून घराची कडी उघडली. या वस्ती लगत असलेल्या बाळू भालसिंग यांना या घटनेची पोलिसाला माहिती देऊन जखमी शेतकरी ज्ञानेश्वर भुमरे यांनी पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भांबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाचोड पोलीसांचा धाक संपला
पाचोड पोलीसांचा चोरट्यांवर कसलाच धाक नसल्याचे या घटनेवरुन दिसत आहे. कारण या वस्तीवर चोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. पाचोड पोलीसांनी गस्त घालावी, चोरट्यांना आळा घालावा व नागरिकांची सुरक्षा लक्षात घ्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

पाचोड हद्दीत अट्टल दरोडेखोर
पिस्टलसह एलसीबीने पकडला
दरोडासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारांना पाचोड पोलीस ठाण्याची हद्द सुरक्षित वाटते. पाचोड पोलीसांच्या दुर्लक्षामुळे हे दरोडेखोर निवांत राहतात. शनिवारी ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोनि.भागवत फुंदे यांच्या पथकाने पाचोड परिसरातील शिवाजीनगर भागातून अट्टल दरोडेखोर सचदेव मुराब (रा.रामगव्हाण ता.अंबड जि.जालना) याच्या मुसक्या आवळल्या. त्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, एटीएम कार्ड असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे पोनि.भागवत फुंदे, भगतसिंग दुल्लत, श्रीमती भालेराव, पोशि. प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, राहुल पगारे, नरेंद्र खंदारे यांनी केली.

Exit mobile version